

पुणे: राज्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता अकरावीचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने दिला जाणार असून, त्यासाठी राज्य शासनातर्फे स्वतंत्र नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून नोंदणी शुल्क 100 रुपये आकारले जाणार असून, विद्यार्थ्याला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी कमीत कमी एक व जास्तीत जास्त दहा पसंतीक्रम ऑनलाइन प्रक्रियेमध्ये नोंदवता येणार आहेत.
पुणे, मुंबई यांसह राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. परंतु, चालू शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाने प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest pune news)
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जात वैयक्तिक माहिती भरता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरतील. विद्यार्थ्यांनी द्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे, प्रवेश न घेतल्यास प्रतिबंधित करणे या संदर्भातील कार्यपद्धती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
प्रथम प्राधान्यक्रमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल. तथापि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना सर्वांसाठी खुला या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल.
प्रथम पसंतीक्रम याव्यतिरिक्त अन्य प्राधान्यक्रमांच्या शाखेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास, प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व विशेष फेरीमध्ये सर्वांसाठी खुला फेरीत सहभाग घेऊ शकतील, तथापि घेतलेले प्रवेश रद्द करण्याची मुभा असेल. प्रवेश रद्द केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी अर्ज करता येईल.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसर्या ठिकाणी प्रवेश (गुणवत्तेनुसार) मिळाल्यास तो विद्यार्थी पात्र असेल.
नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना शासनाचे नियम डावलून एकही प्रवेश ऑफलाइन पद्धतीने करता येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रथम प्राधान्यक्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम भरताना किमान 1 प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल 10 पसंतीक्रम भरता येतील. प्रथम प्राधान्यक्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना सर्वांसाठी खुला या फेरीपर्यंत दुसरी, तिसरी व चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल.