नीलेश झेंडे
दिवे: स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात मिनी विधानसभेच्या निवडणुका अनेक दिवस रखडल्या होत्या. कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी तसेच ग्रामीण विकासाला चालना मिळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संस्था फार मोलाची भूमिका बजावत असतात, आता मात्र या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पुरंदर तालुक्यातील दिवे-गराडे गटात सर्वच पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
नेहमीच चर्चेत असलेला व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे दिवे-गराडे. हा मतदारसंघ या वेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत सदाशिव आण्णा झेंडे यांनी केले आहे.
ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षदेखील होते. वर्षानुवर्ष पुरंदरचे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दादासाहेब जाधवराव आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. दादासाहेब जाधवराव यांचे पुत्र बाबासाहेब जाधवराव यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी सभापतीपदही भूषविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित झेंडे यांनी देखील या मतदारसंघात युवकांची फळी निर्माण केली आहे. जलदूत सागरतात्या काळे यांनी देखील विविध विकासकामांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पत्नी वृषाली काळे यांनी देखील तयारी केली आहे. भाजप नेते बाबासाहेब जाधवराव यांची कन्या उदयनराजे जाधवराव यांनी देखील सोसायटीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यांचे देखील नाव चर्चेत आहे.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गंगारामदादा जगदाळे यांच्या घरातील देखील उमेदवार असू शकतो. जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई झेंडे या स्वतः उमेदवार असू शकतात. त्याचप्रमाणे गौरीताई कुंजीर, गीतांजली ढोणे यादेखील उमेदवार असू शकतात. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत दिवे-गराडे मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस होणार हे निश्चित. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या दिवे गणात अमित झेंडे, अमोल कामठे, नितीन कुंजीर या नावांची चर्चा सुरू असून लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल, हे नक्की.