

कोंडिभाऊ पाचारणे
खेड: तालुक्यातील वाफगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला जागेसाठी येत्या निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीला या गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना (उबाठा) असा सरळ सामना अपेक्षित होता; मात्र, आता शिवसेनेकडून रोहिणी थिगळे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. रोहिणी थिगळे या माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कट्टर समर्थक गणेश थिगळे यांच्या पत्नी आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश येत्या काही दिवसांत होणार असून, या प्रवेशामुळे मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या इच्छुकांबरोबर आणखी काही इच्छुक जनसंपर्कात आहेत.
खेड तालुका हा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. येथील वाफगाव-रेटवडी गटात यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सन २०२२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय फाटाफुटीमुळे पक्षीय चित्र बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना अशा चार प्रमुख गटांमध्ये राजकीय नेते विभागले गेले. या गटात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात थेट स्पर्धा अपेक्षित होती; मात्र, रोहिणी थिगळे यांच्या शिंदे सेनेत प्रवेशाने तिरंगी लढत अटळ झाली आहे. गणेश थिगळे हे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असून, ते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात.
मोहिते पाटील हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अतुल देशमुख हे नुकतेच शिवसेनेत दाखल झाले आहेत. 'रोहिणीताईंचा प्रवेश येत्या काही दिवसांत होईल,' असे गणेश थिगळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, पंचायत समिती गणात सर्वसाधारण जागेसाठी आमचे दोन्ही उमेदवार निश्चित झाले आहेत. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर केली, त्या दिवशी आम्ही परतीचे दोर कापले आहेत. आता मागे वळून पाहणार नाही.
वाफगाव-रेटवडी गटात २२ गावे आणि ४२ हजारांहून अधिक मतदार आहेत, ज्यात शेतकरी, सहकारी संस्था कर्मचारी आणि ग्रामीण महिला मतदारांचा समावेश आहे. या गटातील प्रमुख मुद्दे म्हणजे पाणीपुरवठा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा आणि रोजगार. रोहिणी थिगळे यांच्या पक्षांतरामुळे अजित पवार गटात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. रोहिणी राक्षे आणि अश्विनी पाचारणे या दोघी इच्छुक असून पक्ष कोणाला उमेदवारी देतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिवसेनेत प्रवेश करून रोहिणी थिगळे या उमेदवार होणार हे निश्चित झाले आहे. तर शिवसेनेची (उबाठा) उमेदवारी दीप्ती भोगाडे यांना जवळपास निश्चित झाली आहे. असे असले तरी, शिंदे सेनेची सरकारी यंत्रणा आणि अतुल देशमुख यांचा प्रभाव तिरंगी लढतीत निर्णायक ठरू शकतो.