पुणे: ऐन दिवाळीत एक भरकटलेला फटाका 34 वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) यांच्या बाल्कनीमध्ये शिरला. फटाक्याच्या स्फोटामुळे काच फुटून अनेक कण उडाले व त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना इजा झाली. त्यामुळे रुग्णाच्या डोळ्याच्या पटलावर (कॉर्निया) छिद्रे दिसून आली, डोळ्यातील भिंगावर मोतिबिंदू झाल्याचे व बाहेरून आलेले काचेचे कण रुतून राहिल्याने दृष्टिपटल फाटल्याचे दिसून आले. (Latest Pune News)
या सगळ्या हानीमुळे राजेश यांच्या दृष्टीचे गंभीर नुकसान झाले. रुग्णाला डोळ्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या तत्परतेने रुग्णाने गमावलेली दृष्टी पुन्हा मिळवली. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवाळीत फटाक्यांपासून डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. भारतात मागील वर्षी फटाक्यांशी संबंधित डोळ्यांना दुखापत झाल्याची 2,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी सुमारे 60% प्रकरणे 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची आहेत आणि सुमारे 10 टक्के कायमची दृष्टी गमावली आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सणासुदीच्या काळात डोळ्यांना होणाऱ्या 20 टक्के आपत्कालीन दुखापती फटाक्यांमुळे होतात, ज्यात 15 वर्षांखालील मुले 30 टक्के आणि पुरुष 85 टक्के प्रभावित होतात. त्यामुळे डोळ्यांसह कानांचीही काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
फटाक्यांवरील रसायनांच्या सूक्ष्म धूलिकणांचा हाताशी संपर्क येतो. फटाक्यांच्या संपर्कात आलेले हात एकमेकांवर चोळणेही घातक असते. घातक परिणाम लक्षात घेता लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नयेत. फटाक्यांच्या रसायनांशी संपर्क आलेले हात डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता असते. लहान मुले फटाके फोडत असताना घरातल्या मोठ्या मंडळींनी कटाक्षाने लक्ष द्यावे. मुलांचे हात साबणाने धुवून घ्यावेत. हात धुतल्याशिवाय मुलांना डोळे चोळणार नाही, ही खबरदारी घ्यावी. काही दुर्घटना घडल्यास बाजारात सहज उपलब्ध होणारे ड्रॉप्स थेट वापरू नका. अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.डॉ. आदित्य केळकर, एनआयओ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
फटाके फोडताना किंवा बघताना योग्य अंतरावरून उभे राहा. संरक्षणात्मक चष्मा वापरा, जेणेकरून ठिणग्या किंवा रसायने डोळ्यात जाणार नाहीत. डोळ्यात खाज, जळजळ किंवा त्रास जाणवल्यास डोळे चोळू नका, स्वच्छ पाण्याने हलकेच धुवा. धूर किंवा धुळीमुळे त्रास होत असल्यास लुबिकेटिंग आयड्रॉप्स वापरा. डोळ्यांना दुखापत झाल्यास स्वतः उपचार करू नका. त्वरित जवळच्या नेत्ररुग्णालयात जा.डॉ. हेमंत कांबळे, एएसजी आय हॉस्पिटल
फटाक्यांमुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात. फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर तसेच त्यातील रसायनांमुळे दमेकरी तसेच सीओपीडीचा त्रास असलेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास उद्भवतो. फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजाने बहिरेपणाचीही शक्यता नाकारता येत नाही. रसायने आणि धूलिकणांच्या मिश्रणातून फटाक्यांची निर्मिती केली जाते. फटाक्यांमध्ये वापरली जाणारी रसायने मानवी शरीरासाठी अपायकारक असतात. दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाण वाढत राहिल्यास वातावरणात सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढते. सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम 2.5) वाढते प्रमाण श्वसनविकारासह हृदयविकारासही कारणीभूत ठरते.डॉ. नीलेश सोनावणे, फुफ्फुसरोगतज्ज्ञ सल्लागार, अपोलो