

पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात 2016 मध्ये विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनातून झालेल्या संघर्ष प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुणे सत्र न्यायालयाने सर्व आरोपातून दोषमुक्त केले आहे. आव्हाड यांनी बेकायदा जमाव जमविल्याचे किंवा हिंसक कृत्य केल्याचा कोणताही पुरावा नाही; उलट ते हल्ल्याचे पीडित आहेत, असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला.(Latest Pune News)
या प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार बेकायदा जमाव जमविणे, दंगल माजविणे, इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, इतरांचे जीवित किंवा सुरक्षितता धोक्यात आणणे आदी कलमांनुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना दोषमुक्त करण्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नकार दिला होता. त्या विरोधात आव्हाड यांनी ॲड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात फौजदारी फेरविचार अर्ज केला होता. फर्ग्युसन महाविद्यालयात 23 मार्च 2016 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व आंबेडकरवादी - डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित देशविरोधी घोषणाबाजीवरून हे दोन गट आमनेसामने आले होते. त्यावेळी आव्हाड ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यां समवेत फर्ग्युसन महाविद्यालयात गेले होते. त्यावेळी जमावाने आव्हाडांवर दगड, बाटल्या व चपला फेकल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली होती.
या प्रकरणात आव्हाड यांना आरोपी करण्यात आले. आव्हाड स्वतः जमावाच्या हल्ल्याचे पीडित असून, जमावाचा भाग नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद बचावपक्षाने केला. हा युक्तिवाद ग््रााह्य धरत न्यायालयाने आव्हाड यांना दोषमुक्त केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.