Valentine Special Disabled Couple Inspiration Pudhari
पुणे

Valentine Special Disabled Couple Inspiration: दिव्यांगत्वावर मात करत हरिदास–संगीताने उभारले आनंदी संसार

‘तिमिरातून तेजाकडे’ वाटचाल; दिव्यांग दाम्पत्याचा संघर्ष, प्रेम आणि समाजकार्याचा प्रेरणादायी प्रवास

Sakshi Kadam

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: ते दोघेही दोन्ही पायांनी अस्थिव्यंग दिव्यांग...तीव दिव्यांगत्वावर मात करत हरिदास आणि संगीता एकत्र आले.‌‘तिमिरातूनी तेजाकडे‌’ या ओळी सार्थकी लावत त्यांनी एकमेकांच्या साथीने वैवाहिक जीवनाचा श्रीगणेशा केला. गेली सात वर्षे दोघेही दिव्यांगत्वावर मात करत वैवाहिक जीवन अतिशय आनंदाने जगत आहेत. त्यांचा अवघ्या पाच वर्षांचा चिरंजीव सार्थक घरातील अनेक कामांसाठी आई-वडिलांना हातभार लावत स्वतःची कामेही स्वतःच करतोय, हे विशेष!

हरिदास शिंदे बीड जिल्ह्यातील आणि संगीता बावीस्कर जळगाव जिल्ह्यातील... दोघांनाही बालपणातच दिव्यांगत्व आले. उपचार व शिक्षणाच्या निमित्ताने दोघे पुण्यातील वानवडीच्या दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेत दाखल झाले. त्यांनी सहावी ते दहावी एकाच वर्गात शिक्षण घेतले. त्यानंतर दोघेही आपापल्या गावाला परत गेले. अकरावी- बारावी झाल्यावर हरिदास पुढील शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात आले. ज्या संस्थेत शिक्षण घेतले त्याच संस्थेच्या प्राथमिक शाळेत हरिदासला पाच वर्षे अल्प मानधनावर कलाशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वय वाढत असल्यामुळे घरचे लग्नासाठी आग््राह करत होते. मात्र, दिव्यांगत्वामुळे आणि अल्पमानधनामुळे जोडीदार मिळणे अवघड होत होते. दरम्यान, हरिदास यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्यासोबत ओळख झाली व त्यांनी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात काम सुरू केले. दहावीनंतर वानवडीची संस्था सोडल्यानंतर तब्बल सतरा- अठरा वर्षांनी संस्थेतील बालमित्र गहिनीनाथच्या मध्यस्थीने संगीता व हरिदासचा संपर्क झाला आणि त्यांनी थेट लग्नाचा निर्णय घेतला.

दोघे तीव दिव्यांग व वेगवेगळ्या जातींचे असूनही संस्थेतील अधीक्षिका धनश्रीताईंनी समझोता केला. त्यामुळे पालकांनी तयारी दाखवली. डॉ. बाबा आढाव आणि दोघांच्या परिवारातील मोजक्या लोकांच्या प्रमुख उपस्थितीत 16 ऑगस्ट 2018 रोजी संगीता व हरिदास यांचा नोंदणी विवाह पार पडला. वैवाहिक जीवनात अनेक धाडसी निर्णय घेत आणि येईल त्या परिस्थितीवर मात करत दोघांनी आजवर सुखाचा संसार केला आहे.

लग्नानंतर हरिदास यांनी मुक्त विद्यापीठातून बीए आणि एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. सध्या हरिदास शिंदे हे पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या जीवनात आलेल्या अडचणी इतर दिव्यांग बांधवांना येऊ नये म्हणून हरिदास नेहमीच झगडत असतात. या कार्यात त्यांना संगीता यांचीही साथ मिळते आहे.

आम्ही दोघं समाधानी, आनंदी जीवन जगत आहेत. संगीता यांचा मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यायचा मानस आहे. दोघांनी मिळून बांधिलकी फाऊंडेशन नावाची सामाजिक संस्था स्थापन केली आहे. समाजातील दिव्यांग, अनाथ तसेच दुर्लक्षित समाजघटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्याचा मानस आहे.
हरिदास शिंदे
हरिदास लहानपणापासूनच सैराट आहे. पण त्याचा स्वभाव स्पष्ट आहे त्यामुळे आमचे अनेकदा भांडणं झाली तरी दुसऱ्या दिवशी काल काहीच झालं नाही असं वाटतं. लग्नानंतर माझं अर्धवट शिक्षण पूर्ण होत आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण मलाही माझ्यासारख्या दिव्यांग महिलांसाठी समाजकार्य करायचे आहे.
संगीता शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT