

pune municipal corporation road development plan
पुणे: शहरातील वाहतूक शिस्तबद्ध, सुरक्षित व भविष्योन्मुख बनविण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने आगामी आर्थिक वर्षासाठी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्पीय आराखडा तयार केला आहे. ऐतिहासिक वारसा जपत लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता व शिवाजी रस्ता यांचे हेरिटेज धर्तीवरील पुनर्रचना डिझाइन केले आहे. त्याअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते कुंटे चौक हा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. नदीकाठचा आणि शहराच्या दळणवळणासाठी अत्यावश्यक असलेला शिवणे-खराडी रस्ता यंदा प्राधान्याने विकसित केला जाणार आहे. तसेच, 32 प्रमुख रस्त्यांपैकी नऊ महत्त्वाच्या मार्गांसाठी कॉरिडोर इम्प्रूव्हमेंट प्लॅन, तर 30 रस्त्यांवरील गर्दीच्या चौकांसाठी जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्लॅन राबविण्यात येणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याचे संपूर्ण लांबीचे 50 मीटर रुंदीकरण, मिसिंग लिंक व डीपी रस्त्यांची कामे देखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या 480 चौ. कि.मी. क्षेत्रात पथ विभागाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुरक्षित, दर्जेदार आणि वाहतूकक्षम रस्ते या ध्येयाने व्यापक अर्थसंकल्पीय आराखडा सादर केला आहे. रोड ॲसेट मॅनेजमेंट सिस्टम सर्वेक्षणानुसार शहरात 3 मी. ते 60 मी. रुंदीचे एकूण 2273 कि.मी. रस्ते असून, त्यापैकी 32 मुख्य रस्त्यांची लांबी 270 कि.मी. आहे. शहरातील सुमारे 80 टक्के वाहतूक या रस्त्यांवर अवलंबून असल्याने या मार्गांवर दर्जावाढ, सुरक्षितता उपाययोजना, पदपथ दुरुस्ती व वॉकेबिलिटी वाढ, तसेच पावसाळी व ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणण्याची कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे.
शहरातील 12 महत्त्वाच्या मिसिंग लिंकच्या जागा ताब्यात घेऊन त्यांचे विकसन, तसेच वाकड ते कात्रजदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील सेवारस्ते टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा आराखडा आहे. नवले पुलाजवळील सेवा रस्त्यांना अपघात कमी करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. नदीकाठचा महत्त्वाचा शिवणे-खराडी रस्ता जास्तीत जास्त विकसित करणे, तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे संपूर्ण 50 मीटर रुंदीकरण पूर्ण करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
32 मुख्य रस्त्यांपैकी 9 रस्त्यांसाठी कॉरिडोर इम्प्रूव्हमेंट प्लॅन आणि 30 रस्त्यांसाठी जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार असून, त्यानुसार कामे सुरू केली जाणार आहेत. गणेशखिंड रस्त्याच्या टप्पा-3 (आरबीआय ते संचेती पूल) साठी भूसंपादनावर भर, विमानतळ रस्ता सीएसआरमधून पूर्ण करणे आणि पीपीपी तत्त्वावर किमान पाच रस्ते विकसित करणे अशी कामे हाती घेतली जातील. गुणवत्ता व गतीसाठी एसओपी तयार करून मिलिंग-रिसर्फेसिंगला चालना दिली जाणार आहे. ‘रोड मित्र’, ‘युवर ऑफिसर’ आणि ‘ट्रेंचिंग’ ॲपचा वापर वाढवून पारदर्शकता व समन्वय साधला जाईल.
अर्बन मोबिलिटी सेल स्थापून जीआयएस व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्राफिक डेटा वापरून नियोजन केले जाईल. येरवडा येथे नवीन हॉट मिक्स प्लांट उभारणे आणि मिलिंग, पेव्हर, रोलर, ट्रॅक्टर, डंपर यांसारखी यंत्रसामग्री खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. 2025- 26 मध्ये 18,000 खड्डे बुजविणे, 2,000 चेंबर समपातळीत आणणे, 11 मिसिंग लिंक ताब्यात घेणे आणि 4 पूर्ण करणे, तसेच 75 कि.मी. रस्त्यांचे जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी उन्नतीकरण करून वाहतुकीचा वेग सुमारे 10 टक्के वाढविणे, या कामांच्या पार्श्वभूमीवर 2026-27 मध्येही पथ विभाग शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
समाविष्ट गावांतील एका प्रमुख रस्त्याचे सर्वांगीण काम
चालू वर्षात सर्व रस्त्यांवरील चेंबर समपातळीत आणणे, नादुरुस्त रस्ते व पदपथांची दुरुस्ती आणि नव्या पदपथांची उभारणी हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नव्याने समाविष्ट 32 गावांमधील किमान 1 मुख्य रस्ता सर्वांगीण विकसित करण्यात येणार असून, डांबरीकरणापूर्वी पाणीपुरवठा व जलोत्सारण विभागाकडून आवश्यक नलिका टाकण्याचे आणि पथदिव्यांचे नियोजन करण्याचे ठरले आहे.
मिसिंग लिंकच्या जागा ताब्यात घेऊन रस्ते तयार करणे
या आर्थिक वर्षामध्ये शहरातील 12 महत्त्वाच्या मिसिंग लिंकच्या जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करण्याचे उद्दिष्ट पथ विभागामार्फत ठेवण्यात आलेले आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ते वाकड ते कात्रज यादरम्यानच्या जागा टप्प्या-टप्प्याने ताब्यात घेऊन सेवा रस्त्यांचे विकसन करण्याचे काम खात्यामार्फत करण्यात येणार आहे.
नवले पुलाजवळील सेवारस्त्यांची कामे प्राधान्याने करणार
नवले पुलाजवळील वाहतूक सुरळीत व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या दृष्टीने येथील सेवारस्ते प्राधान्याने विकसित करण्यात येणार आहेत. व्हीआयपी रस्त्याचा भाग असलेला गणेशखिंड रस्त्याच्या टप्पा 3 चे काम आरबीआय बँक ते संचेती पूल यादरम्यानच्या टप्याचे भूसंपादन बहुतांश प्रमाणात पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे व ताब्यात आलेल्या रस्त्यांच्या विकसनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांची माहिती
शहराचे एकूण क्षेत्रफळ 480 चौ. कि.मी.
शहरातील एकूण रस्ते लांबी 2273 कि.मी.
मुख्य रस्ते संख्या 32
मुख्य रस्त्यांची लांबी 270 कि.मी.
वाहतुकीचा भार 80 टक्के वाहनांचा भार या प्रमुख रस्त्यांवर
2026-27 मधील प्रमुख लक्ष्य
12 मिसिंग लिंक ताब्यात व विकसित
9 कॉरिडोर इम्प्रूव्हमेंट प्लॅन
30 जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्लॅन
50 मी. कात्रज-कोंढवा रुंदीकरण (संपूर्ण लांबी)
5 पीपीपी रस्ते पूर्ण; समाविष्ट गावांतील 1 मुख्य रस्ता पूर्णपणे विकसित करणे
2025-26 मध्ये झालेली कामे
18,000 खड्डे बुजविले
2,000 चेंबर समपातळीत
75 कि.मी. रस्ते विकसित (पुणे ग््राँड टूर)
10 टक्के वाहतुकीचा वेग वाढ
प्राधान्य असलेल्या 33 मिसिंग लिंकच्या जागांपैकी 11 जागा ताब्यात
4 मिसिंग लिंकच्या जागांचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत