खेड : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पारंपरिक जनसंपर्क आणि मतदारांच्या पाठिंब्याऐवजी ‘सोशल मीडिया’ची जादू चालविण्याचे नवे ‘ट्रेंड’ सुरू झाले असून, यामुळे प्रचाराच्या आणि संभाव्य उमेदवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Latest Pune News)
अनेक इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियात व्हायरल होण्यासाठी आकर्षक डिझाइन आणि मीम्स तयार करून चांगले काम करणाऱ्या लोकप्रिय नेत्यांनाही प्रसिद्धीत मागे टाकले आहे. यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले असून, ‘डिजिटल उमेदवारी’चे पेव फुटल्याचे चित्र दिसत आहे.
पारंपरिकपणे या निवडणुकांमध्ये उमेदवार मतदारांशी थेट संपर्क साधून, गावोगावी फिरून आणि विकासकामांची यादी सादर करून मते मागतात. मात्र, या वेळी चित्र पूर्णपणे बदलले आहे. जनसंपर्क नसलेले आणि मतदारांच्या पाठिंब्याशिवाय असलेले काही इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करीत आहेत.
या ट्रेंडमुळे मतदारांमध्ये द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. राजगुरुनगर शहरातील एका मतदाराने सांगितले की, आम्ही आमच्या नेत्यांच्या कामावर विश्वास ठेवतो. पण, सोशल मीडियावर येणारे मीम्स आणि व्हिडीओ पाहून मनात शंका येते. खरे काय आणि खोटे काय, हे समजत नाही. दुसरीकडे, युवा मतदारांना हे आवडत आहे. ‘हे मजेदार आहे आणि निवडणुकीमध्ये मनोरंजन देत आहे,’ असे एका तरुणाने म्हटले. यातच विश्वासार्ह बँडच्या माध्यमातून हे होत नसल्याने लोकांचा त्यावर विश्वासही बसत नाही, याकडे फक्त मनोरंज म्हणूनच पाहिले जात आहे.
‘डिजिटल खेळ’ संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे निवडणुकीत पैशाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, ज्यामुळे गरीब आणि पारंपरिक उमेदवार मागे पडतील. निवडणुकीला लोकशाहीऐवजी मनोरंज बनविण्याचा धोका आहे, असे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणे हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. आम्ही सायबर सेलच्या मदतीने लक्ष ठेवून आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सूचना दिल्या आहेत की, निवडणुकीशी संबंधित सामग्रीची तपासणी करावी आणि बनावट खात्यांना ब्लॉक करावे.