पुणे

कमी प्रवेश असलेले अभ्यासक्रम बंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती नसेल तर असे अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहेत.

प्रत्येक अभ्यासक्रमाला किमान 30 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित असणे गरजेचे आहेत. तसे निर्देश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी विद्यापीठातील शैक्षणिक विभागाच्या विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसलेले अनेक अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डॉ. पवार यांनी पुणे विद्यापीठातील विभागप्रमुखांना दिलेल्या निर्देशानुसार, व्यवस्थापन परिषदेच्या 26 जून रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सध्या सुरू असलेले सर्व अभ्यासक्रम राबविताना त्यांची अर्थिक स्वयंपूर्तता तपासून घेऊन प्रवेशक्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश असल्यास संबंधित अभ्यासक्रम राबविण्यात येऊ नयेत. तसेच अभ्यासक्रमांना किमान प्रवेश क्षमता 30 असावी, त्यानुसार विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील सर्व विभागप्रमुखांनी कार्यवाही करावी, असे कळविले आहे.

विद्यापीठात पाली, संस्कृत यासह अन्य अनेक विभाग आहेत. ज्या विभागांमध्ये विद्यार्थीसंख्या दरवर्षी कमी असल्याचे दिसते. अशा विभागांना विद्यापीठाच्या संबंधित निर्णयाचा फटका बसणार असल्याचे चित्र दिसून येते.

SCROLL FOR NEXT