पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असे असले तरी युतीबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्पष्ट केली.(Latest Pune News)
ज्या ठिकाणी युती शक्य होईल, तेथे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येईल; तर जेथे युती झाली नाही तेथे भाजप स्वतंत्र लढण्याचा विचार करेल. मात्र, निवडणुकीदरम्यान मित्रपक्षांवर टोकाची व मनभेद होणारी टीका टाळावी, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या धोरणाबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील सर्व विभागांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढाव्यातून भाजपसाठी सकारात्मक परिस्थिती दिसून आली आहे. निवडणुका शक्यतो महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न असेल. मात्र, युती शक्य न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयात केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप राहणार नाही. तथापि, स्वतंत्र लढत दिल्यासही मित्रपक्षावर टीका न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात निधीचे वितरण झाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी शक्य तितक्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काहींना दिवाळीनंतरही मदत मिळेल.”
नीलेश घायवळ याच्या पासपोर्ट संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पासपोर्ट घेण्याकरता त्याने अहिल्यानगर जिल्ह्यात अर्ज केला, तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी घायवळला पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही. तो तिथे राहात नसताना असा अहवाल याला हवा होता की, हा व्यक्ती इथे राहात नाही. मात्र, याचा अहवालात कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे हा पासपोर्ट घायवळला मिळाला आणि तो पळून जाऊ शकला. तेव्हा कोणाचा दबाव होता? निवडणुकीत त्यांनी कोणाचे काम केलं होतं ? त्याला कोणाचा आशीर्वाद होता ? या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत. माझं मत अतिशय स्पष्ट आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थरा देता कामा नये. अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केली जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल सादर केला त्यांची देखील चौकशी केली जाईल.