पुणे

पुणे : ‘त्यांच्या’ मद्यधुंद रात्रींची पोलिसांना डोकेदुखी! परिमंडळ चारमध्ये विशेष मोहीम

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नियमांना तिलांजली देत रात्री उशिरापर्यंत मद्यधुंद रात्र जागविणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचालकांविरुद्ध परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कारवाई केल्यानंतरदेखील सतत नियम मोडणार्‍या तब्बल 14 हॉटेल, रेस्टॉरंट बारचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य उत्पादन शुल्क आणि महापालिकेकडे पाठविला आहे. त्यामुळे 'नियमात चाला; अन्यथा कारवाई अटळ' असाच इशारा त्यांनी दिला आहे.

सबंधित बातम्या :

विमानतळ, येरवडा आणि चतुःश्रुंगी परिसरात मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट आणि बार आहेत. रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटला नियमानुसार परवानगी आहे. मात्र अनेकदा त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट बार चालू ठेवणे असे प्रकार सुरू असून, त्यांचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ गांभीर्याने दखल घेत स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या बैठका घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेस्टॉरंट आणि बार चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचनादेखील दिल्या.

मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा होताना दिसून आली नाही. पोलिसांनी कारवाई केली. मात्र, त्यानंतरदेखील काही रेस्टॉरंट व बार चालकांमध्ये बदल दिसून आला नाही. यानंतर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना सूचना देऊन अशा 14 रेस्टॉरंट बारचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य उत्पादन शुल्क आणि महापालिकेला पाठविला आहे. यात येरवडा 5, विमानतळ 5 आणि चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन रेस्टॉरंट बारचा समावेश आहे. आता त्यांच्याकडून काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काय परिणाम होतात..

  • आवाज मर्यादा आणि वेळ न पाळल्यामुळे स्थानिकांना त्रास.
  • कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न.
  • गुन्हेगारी घटनामध्ये वाढ.
  • भांडण, हाणामारी, विनयभंग अशा घटना.
  • पोलिसांना नाहक बदनामी आणि मनस्ताप.
  • आग, गॅसगळती, चेंगराचेंगरीची घटना जिवावर बेतू शकते
  • रूफटॉप हॉटेलमध्ये आगीच्या घटना.

पोलिसच 'व्हिलन' !

रात्रीच्या वेळी कर्कश आवाजात पहाटेपर्यंत मद्यधुंद रात्र जागविणार्‍या रेस्टॉरंट, पब आणि बारचा स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतो. विशेषतः विमानतळ, कोरेगाव पार्क परिसरातील नागरिक यामुळे हैराण आहेत. पोलिसांना कॉल केल्यानंतर पोलिस कारवाई करतात. मात्र पोलिसांच्या कारवाईला काही मर्यादा आहेत. खटले भरणे आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविणे एवढेच पोलिस करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कारवाईचा फारसा फरक रेस्टॉरंट-बारवाल्यांना पडत नाही. त्यांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क आणि महापालिका प्रशासनाला आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतरदेखील चार-आठ दिवसांनी परत या हॉटेल, रेस्टॉरंट बार आणि पब चालकांचे 'रात्रीस खेळ चाले' सुरू होते. यामुळे नागरिकांच्या नजरेत पोलिसच सतत व्हिलन होत असल्याचे दिसते.

रूफटॉप हॉटेलचा मुद्दा ऐरणीवर

शहरात किमान दोन हजार रूफटॉप हॉटेल आहेत. ही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महापालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून या हॉटेलचे परवाने रद्द करावे, अशी मागणी केली आहे. सर्वात गंभीर म्हणजे काही रेस्टॉरंट बारमध्ये आपत्कालीन व्यवस्था नाही. रुफटॉप हॉटल, रेस्टॉरंट बारचालकांकडून नियम धाब्यावर बसवून कमी जागेत मोठी गर्दी जमवली जात असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT