Bjp vs Ncp Pudhari
पुणे

Rahu Khamgaon ZP Election Result: राहू-खामगाव गटात भाजपला धक्का; छुप्या मतदानामुळे राष्ट्रवादीचा विजय

सागर शेलार यांचा अनिल सोनवणे यांच्यावर विजय; भाजपमध्ये अंतर्गत गद्दारीवरून खळबळ

पुढारी वृत्तसेवा

राहू: दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग शमल्यानंतर आता राजकीय गणितांच्या चर्चांना उधाण आले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग््रेासने जिल्हा परिषदेच्या सहा जागांवर वर्चस्व मिळवले असले तरी पंचायत समितीवर मात्र आठ जागा जिंकत भाजपने आपले ‌‘कमळ‌’ फुलवले आहे.

मात्र, या संपूर्ण निकालात सर्वाधिक चर्चा होत आहे, ती राहू-खामगाव जिल्हा परिषद गटाची. या हक्काच्या गटातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, आता पक्षांतर्गत गद्दारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था ‌‘इकडे आड तिकडे विहीर‌’ अशी झाली आहे.

राहू-खामगाव गट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार सागर शेलार यांनी भाजपचे अनिल सोनवणे यांचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने शेलार यांचा केलेला प्रचार आणि त्यांना केलेले मतदान, असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने हा गड भाजपच्या हातून निसटला.

ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा दिला, त्यांची अवस्था आता अत्यंत केविलवाणी झाली आहे. एकीकडे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडल्यामुळे आमदार राहुल कुल यांच्यासमोर जाण्याची या कार्यकर्त्यांची हिंमत होत नाहीये. तर दुसरीकडे, ज्या सागर शेलार यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, त्यांच्यासोबत उघडपणे फिरणेही आता या कार्यकर्त्यांना जड जात आहे. विश्वासू असूनही ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्याची भावना भाजपच्या निष्ठावान गोटात असल्याने या ‌’छुप्या‌’ समर्थकांची पक्षात मोठी कोंडी झाली आहे.

सध्या राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) महायुतीमध्ये एकत्र आहेत. मात्र, आगामी काळात हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडेच राहण्याचे संकेत मिळत असल्याने या कार्यकर्त्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. स्वकीयांनीच धोका दिल्याने आमदार राहुल कुल भविष्यात या कार्यकर्त्यांवर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

भविष्यात पुन्हा भाजपचेच काम करावे लागणार असल्याने आता कोणत्या तोंडाने पक्षश्रेष्ठींकडे जावे, या विचाराने कार्यकर्ते सध्या ‌‘चलबिचल‌’ अवस्थेत आहेत. राहू-खामगावच्या या राजकीय नाट्यामुळे दौंडच्या राजकारणात ‌‘गद्दारी‌’ आणि ‌‘एकनिष्ठता‌’ यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. विजयाचा गुलाल सागर शेलार यांनी उधळला असला, तरी भाजपच्या त्या छुप्या कार्यकर्त्यांना मात्र आता पराभवापेक्षाही स्वतःच्या राजकीय भविष्याची अधिक भीती वाटू लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT