भिगवण: अल्पवयीन मुलीला फोन आणि मेसेज करून "जर तू बोलली नाहीस तर गावात तुझी बदनामी करेल तसेच आई-वडिलांसह भावास गायब करीन, घरच्यांना त्रास देईल,’’ अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दौंड तालुक्यातील अनिकेत राजेंद्र नगरे याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षाच्या मुलाच्या या प्रतापाने दौंड तालुक्यात चांगलाच संताप व्यक्त होत आहे. ५ मे ते २५ मेदरम्यान हा प्रकार घडला असून, ३१ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. स्वतः पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
अनिकेत राजेंद्र नगरे (रा. खानोटा, ता. दौंड) याने आपल्या मोबाईलवरून संबंधित मुलीला दि.५ मे रोजी 'हाय' असा मेसेज टाकला. त्यानंतर 'तू मला आवडतेस' असाही मेसेज टाकला. मात्र, संबंधित मुलीने तो 'डिलीट' करून टाकला. व संबंधित मुलगी आपल्या मोबाईलवर 'रिप्लाय' देत नसल्याने अनिकेतने तिच्या वडिलांच्या फोनवर कॉल करण्यास सुरुवात केली.
त्यावर मुलीने कॉल करू नको, असे सांगितले असता अनिकेत याने संबंधित अल्पवयीन मुलीला ‘‘तू जर फोन आणि मेसेजवर बोलली नाहीस तर मी तुझ्या भावाला गायब करून टाकीन आणि कोणाला सांगितले तरीही तुझ्या घरच्यांना त्रास देऊन बदनामी करेन,’’ अशी धमकी दिली.
त्यानंतरही मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवरून अनिकेत याने फोनवर बोलण्याचा हट्ट धरत होता. त्यानंतर दि. ११ मे रोजी देखील वडिलांच्या मोबाईलवर फोन करून एका मंदिरात भेटण्याची इच्छा व्यक्त केली व नाही आली तर पुन्हा बदनामीची धमकी देण्यात आली. भीतीपोटी मुलगी भेटण्यास येताच अनिकेत याने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली. तसेच बळजबरी करून हात पकडून विनयभंग केला.
त्यावेळी संबंधित मुलीने प्रतिकार करून सुटका करून घेतली. त्यानंतरही तुझी गावात बदनामी करेन, अशी धमकी देत मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर बोलण्यास भाग पाडत होता. तसेच दि. २५ मे रोजी फोन करून 'तू जर माझ्याशी बोलणे बंद केले तर तुझे फोटो गावात दाखवून बदनामी करेन' तसेच 'तुझ्या भावाला आईवडिलांना मारून टाकीन' अशी धमकी दिली. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून संबंधित मुलीने अनिकेत नगरे याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 'पोस्को'सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अनिकेतला अटक केली आहे. अनिकेत नगरे हा महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नगरे यांचा मुलगा आहे.