

पौड रोड: पौड रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलजवळील महापालिकेकडून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. त्यातून उत्पन्न मिळावे म्हणून व्यावसायिक गाळेही बांधण्यात आले आहेत. परंतु हे गाळे भाड्याने देण्याचा विसर प्रशासनाला आहे. यामुळे हे गाळे बंद ठेवण्यासाठी बांधले आहेत का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
भुयारी मार्गाच्या आतील बाजूस लाखो रुपये खर्चून आठ दुकाने बांधण्यात आली आहेत. परंतु ही दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने महिला या मार्गाचा वापर टाळत असल्याचे दिसून येते. हा भुयारी मार्ग खुला करण्यासाठी 2016 मध्ये महापालिकेकडून हा मार्ग खुला करण्यात आला. मात्र, या ठिकाणी बांधण्यात आलेले गाळे अद्याप भाड्याने देण्यात आले नाहीत. महापालिकेचे या गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्न बुडत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून ही नुकसान भरपाई वसूल करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी या भुयारी मार्गाच्या परिसरात काही महिन्यांपूर्वी रंगकाम करण्यात आले. त्यामध्ये 'पुणे दर्शन'चे चित्र रेखाटण्यात आले. मात्र, बंद असलेल्या गाळ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या गाळ्यांचे वाटप पुणे महापालिका नियमावली 2008 नुसार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या भुयारी मार्गाचा विद्यार्थ्यांसह नागरिक आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा वापर होत असल्यामुळे भुयारी मार्गात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून येथे सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने भुयारी मार्गात बांधलेले गाळे वावराविना पडून आहेत. या गाळ्यांचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. बुडालेल्या महसुलाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी.
हरिभाऊ सणस, सामाजिक कार्यकर्ते
मालमत्ता व व्यवस्थापन विभागांशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर या गाळ्यांचे लाभार्थी नागरिकांना वाटप करण्यात येईल.
सुहास जाधव, सहायक आयुक्त, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यलय