Love Affair Pudhari
पुणे

Daund Minors Love Affair Issue: दौंडच्या पश्चिम पट्ट्यात अल्पवयीनांच्या प्रेमाचे पेव; पालकांच्या डोळ्यात हताशाश्रू!

सोशल मीडियाच्या नादात मुलांना संस्कारांचा विसर; पळून जाण्याच्या घटनांनी गावोगाव तणाव वाढला—समुपदेशनाची तीव्र गरज

पुढारी वृत्तसेवा

राहू: दौंड तालुक्याचा सधन आणि बागायती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम पट्‌‍ट्यात सध्या एका गंभीर सामाजिक समस्येने डोके वर काढले आहे. शालेय वयातच मैत्री आणि त्यापुढील प्रेमप्रकरणांमध्ये अडकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. सोशल मीडियाच्या आभासी जगात रमणाऱ्या या मुलांना आई-वडिलांच्या कष्टाचा आणि संस्कारांचा विसर पडला असून, अनेक पालकांवर आता मुलांच्या अशा वागण्यामुळे अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.

सोशल मीडियाचा घातक विळखा पूर्वी शाळेच्या आवारात किंवा गावात मर्यादित असलेली मैत्री आता ‌’स्मार्टफोन‌’मुळे बेफाम झाली आहे. पालकांनी अभ्यासासाठी आणि संपर्कासाठी हाती दिलेले मोबाईल मुलांसाठी घातक ठरत आहेत. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमांतून अल्पवयीन मुले-मुली एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. यातूनच ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे टोकाच्या निर्णयात होत आहे. आभासी जगात वावरताना वास्तवाचे भान हरपल्याने अनेक मुले घराबाहेर पडून पळून जाण्यासारखे धाडसी आणि चुकीचे पाऊल उचलत आहेत.

पालकांच्या स्वप्नांचा चुराडा

आपल्या पोटाला चिमटा घेऊन, शेतात राबून आई-वडील मुलांना शिक्षण देतात. आपली मुले शिकून मोठी होतील, नाव कमावतील, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, प्रेमाच्या मोहपाशात अडकलेली मुले एका क्षणात या कष्टावर पाणी फेरत आहेत. ‌’आम्ही मुलांसाठी काय कमी केले?‌’ असा हताश सवाल करत अनेक पालक पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवताना दिसत आहेत. मुलांच्या या वागण्यामुळे कुटुंबाची समाजात मानहानी होत असून, आई-वडिलांच्या डोळ्यांत केवळ पाणी उरले आहे.

गावगाड्याची बिघडलेली बैठक ही चर्चेत

सध्या समाज बदलला आहे आणि आंतरजातीय विवाहांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनही मिळत आहे. सज्ञान वयात आणि कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेले निर्णय समाज स्वीकारू लागला आहे. मात्र, सध्याचे चित्र वेगळे आहे. केवळ शारीरिक आकर्षण आणि वयाचा अपरिपक्वपणा यातून होणाऱ्या पलायनामुळे गावातील सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. दोन कुटुंबांतील वाद विकोपाला जाऊन त्याचा परिणाम गावाच्या एकोप्यावर होत आहे. ‌’गावगाडा‌’ जो सामंजस्यावर चालतो, त्याची बैठक या घटनांमुळे बिघडत चालली आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यामुळे ‌’पोक्सो‌’सारखे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत, ज्यामुळे मुलांचे भविष्य तर उद्ध्वस्त होतच आहे, पण दोन समाजांत किंवा गटात तेढ निर्माण होत आहे.

समुपदेशनाची गरज

केवळ पोलिसांत तक्रारी दाखल करून हा प्रश्न सुटणारा नाही. यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे झाले आहे. मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यावर त्यांचे काय चालले आहे, यावर लक्ष ठेवणे काळाची गरज बनली आहे. तसेच शाळा आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन किशोरवयीन मुलांना योग्य समुपदेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, अन्यथा दौंडच्या या वैभवशाली पट्‌‍ट्याला सामाजिक अधोगतीचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT