यवत: दौंड तालुक्यातील कथित बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरण राज्यभर गाजत असताना तपासादरम्यान एकापाठोपाठ एक धक्कादायक बाबी समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी अनेक नव्या धाग्यादोऱ्यांकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संपर्क साधण्यासाठी परदेशी सिम कार्ड तसेच विविध परदेशी इंटरनेट-आधारित ॲप्सचा वापर करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. अशा माध्यमांचा वापर करून संबंधित व्यक्तींमध्ये संवाद साधला जात होता का? याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सायबर क्षेत्रातील जाणकारांच्या मते, परदेशी सर्व्हरवर आधारित कॉलिंग किंवा मेसेजिंग ॲप्सचा वापर झाल्यास त्यावरील माहिती तातडीने मिळवणे तपास यंत्रणांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करावा लागू शकतो, त्यामुळे तपासाला वेळ लागू शकतो.
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात जप्त करण्यात आलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशिन चिनी बनावटीचे असल्याची माहितीही समोर आली आहे. या उपकरणाची भारतात कायदेशीर नोंदणी होती का? त्याचा वापर कुठे आणि किती काळ करण्यात आला? तसेच त्यामधील डिजिटल नोंदी उपलब्ध आहेत का? याचीही तपास यंत्रणांकडून छाननी सुरू असल्याचे समजते.
यवत पोलिसांकडून मोबाईल फोन, सिम कार्ड, डिजिटल उपकरणे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे संपर्क यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर, दलाल किंवा इतर व्यक्तींचा सहभाग आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गिरीचा खंडणी मागणीसाठीही वापर
संशयित आरोपी अण्णासाहेब गिरी याच्याकडेही काही परदेशी सिम कार्ड असल्याची बाब चौकशीत समोर आली असून, काही व्यक्तींनी गिरी ला खंडणीची मागणी करण्यासाठी तसेच आपली ओळख लपवण्यासाठी विदेशी सिम कार्ड आणि विविध ऑनलाइन ॲप्सचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.