पाटस : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असल्याने दौंड तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. मागील कार्यकाळात जनतेशी संपर्क तोडलेले काही माजी सदस्य आणि नेते आता पुन्हा उमेदवारीसाठी धावपळ करताना दिसत आहेत.(Latest Pune News)
गेल्या पाच-दहा वर्षांत गावपातळीवर एकही ठोस काम न केलेले काही नेते अचानक मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद न साधता थेट पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दारात घिरट्या मारण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.लोकांच्या अडचणी, गावातील मूलभूत प्रश्न, विकासकामे आणि निधीचा उपयोग या सर्व बाबतीत दुर्लक्ष करणारे हेच नेते आता तिकिटासाठी पक्ष कार्यालयात रांगा लावत आहेत. मात्र, मतदार या वेळेस अधिक जागरूक झाले असून, आम्हाला काम करणारे उमेदवारच हवेत अशी प्रतिक्रिया गावोगावी उमटत आहे.
काही ठिकाणी माजी पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजी दिसून येते आहे. त्यांच्या कार्यकाळातील अपूर्ण कामे, लोकांशी तोडलेला संपर्क आणि पदाचा गर्विष्ठपणा हे सर्व मतदारांना चांगले लक्षात आहे. त्यामुळे पक्षाच्या वरदहस्ताने मिळालेले तिकीट म्हणजे विजय याची खात्री राहिलेली नाही.
या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी तरुण आणि नव्या उमेदवारांनी थेट जनतेशी संवाद सुरू केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोकांचा उमेदवार की पक्षाचा? हा प्रश्न निर्णायक ठरणार आहे. मतदारांनी बदलाची तयारी दाखवल्याने अनेकांच्या राजकीय गणितांना मोठा धक्का बसू शकतो.