theft Pudhari
पुणे

Daund Apartment Burglary: दौंडमध्ये बंद घरांना चोरट्यांचा डल्ला; दोन घरांतून ९.८५ लाखांचा ऐवज लंपास

पद्मावतीनगरातील स्वप्नसागर अपार्टमेंटमध्ये कुलूप तोडून चोरी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला

पुढारी वृत्तसेवा

दौंड: दौंड शहरातील पद्मावतीनगर परिसरातील स्वप्नसागर अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा तब्बल ९ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन बाळासाहेब नवले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, नवले हे पत्नी व मुलांसह गुरुवारी (दि. ८) सायंकाळी सुमारे सहा वाजता पद्मावतीनगर येथील त्यांच्या घरातून दौंड शहरातील स्वप्नसागर अपार्टमेंटमध्ये नातेवाईकांकडे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजता त्यांच्या पत्नीला परिचित व्यक्तीचा फोन आला. त्यांच्या घराबाहेर कोणीतरी कडी लावलेली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नवले कुटुंबीयांनी घरी जाऊन पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले.

घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याच अपार्टमेंटमध्ये राहणारे अमित ईश्वरलाल चंडालिया यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. त्यांच्या घरातून सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नवले यांच्या घरातून सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, चेन, गळ्यातील दागिने, कानातील दागिने, नाकातील नथ तसेच चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. दोन्ही घरांमधून चोरीस गेलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ९ लाख ८५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे स्वप्नसागर अपार्टमेंट परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान दौंड पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत. दौंड शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालले आहे चोरटे पोलिसांना सापडत नाहीत त्यामुळे नागरिक भयभीत झाली आहे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT