रामदास डोंबे
खोर : दौंड तालुक्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ग्रामपातळीपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मैदानात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये यंदा थेट तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
यंदाच्या निवडणुकीत तीनही गट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर आपले पॅनेल उभे करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपाकडून विद्यमान आमदार राहुल कुल स्वतः पुढाकार घेत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा प्रचार जोमात सुरू झाला आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार रमेश थोरात, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हे आघाडीवर आहेत. या तिन्ही गटांच्या राजकीय धुरंधरांनी तालुक्याच्या पातळीवर आपली मते एकवटण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे मतविभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा थेट फायदा आमदार राहुल कुल यांना होऊ शकतो असा राजकीय तर्क सुरू झाला आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 6 जागांपैकी 5 आणि पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या तर केवळ एक-एक जागेवर भाजपाला समाधान मानावे लागले होते; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कारण राष्ट्रवादीचे दोन वेगळे गट निर्माण झाल्याने तालुक्यातील समीकरणे पूर्णपणे उलटी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावर्षी पंचायत समितीच्या 14 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी निवडणुका होत असल्याने राजकीय चुरस अधिकच वाढली आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या गोटात रणनीती बैठका सुरू केल्या आहेत. आ. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बुथस्तरावर संघटन मजबूत केले आहे. दुसरीकडे, थोरात आणि पवार गट आपापल्या बालेकिल्ल्यात जनतेचा विश्वास परत मिळविण्यासाठी आक्रमक झाले आहेत.
राजकीय पातळीवर अजित पवार व शरद पवार गटातील लढाई ही केवळ सत्तेसाठी नसून अस्तित्वासाठीची लढाई बनली आहे. दोन्ही गट एकमेकांविरोधात उमेदवार उभे करून मतदारसंघ फोडतील आणि त्यातूनच आमदार राहुल कुल यांची बाजू मजबूत होईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
तिरंगी लढतीच्या या रणधुमाळीत एकीकडे राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांविरोधात झुंजत असताना, दुसरीकडे आमदार राहुल कुल रणनीतीने पाऊल टाकत आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ मतपत्रिकेवर नाही तर राजकीय बुद्धिबळाच्या पटावरील एक तीव चढाओढ ठरणार आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, आमदार राहुल कुल हे दौंड तालुक्यातील सर्वात संघटित आणि नियोजनबद्ध नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मागील काही वर्षांत रस्ते, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि शेती क्षेत्रात केलेली कामगिरी ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत ते आपली ‘चाणक्य नीती’ दाखवून सत्ता आपल्या बाजूला खेचतील का, हा यंदाच्या निवडणुकीचा सर्वात मोठा प्रश्न ठरणार आहे.