पुणे

पुणे : पावसाळी कामांचे कोट्यवधी पाण्यातच

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाले, चेंबर, पावसाळी लाइन्स सफाई आणि रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती आदी पावसाळी कामे शंभर टक्के केल्याचा दावा करणार्‍या महापालिका प्रशासनाचे पितळ मागील काही दिवस सुरू असेल्या पावसामुळे उघडे पडले आहे. अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचून वाहतूक कोंडी होऊन सर्वत्र दाणादाण उडत असल्याने पावसाळी कामासाठी खर्च केलेला कोट्यवधीचा पैसा पाण्यातच गेल्याचे चित्र आहे.

यंदा संपूर्ण पावसाळ्यात म्हणावा तेवढा पाऊस पडला नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच मागील पाच ते सहा दिवस शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे प्रशासनासह नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरात अवघा अर्धा एक- तास जरी मुसळधार पाऊस झाला, तरी रस्ते पाण्याखाली जात आहेत. तसेच पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पावसाळी गटारात पाण्याऐवजी कचरा व पाणी जाऊन बसत आहे. सोसायट्या, बंगल्यांमध्ये पाणी घुसत आहे. त्यामुळे 'आम्ही धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली आहे, पावसाळी गटारांची स्वच्छता झाली आहे, पाणी तुंबलेच तर त्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा तैनात आहे', असे प्रशासनाकडून करण्यात आलेले दावे फोल ठरताना दिसत आहेत. पाऊस पडल्यानंतर मदतकार्य करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कागदावरच अस्तित्वात असल्याने त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे. परिणामी, पावसाळी गटार आणि नाले स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

वर्षभरासाठी निविदा, पण परिस्थिती 'जैसे थे'च

महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पावसाळी गटार, चेंबर आणि नाले सफाईची निविदा काढली. यातील अनेक निविदा पावसाळा सुरू झाल्यानंतर काढण्यात आल्या. त्या वेळी प्रशासनाने स्वच्छतेची कामे वर्षभर केली जाणार असल्याचे सांगितले होते. तसेच ही कामे 100 टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र, एकदा स्वच्छता केल्यानंतर पुन्हा ठेकेदाराने पावसाळी गटार, चेंबरची झाकणे याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे मागील काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या भागातील नाले व पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाही सतर्क आहे.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यासह सर्वत्र पाणी साचत आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये, दवाखान्यांमध्ये पाणी शिरत आहे. प्रशासनाला निवेदने देऊनही काहीच उपाय योजना केल्या जात नाहीत. रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पावसाळी लाइन स्वच्छ करणे गरजेचे आहे.

– भूपेंद्र मोरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, खडकवासला मतदार संघ.

पाणी साचण्याची ही आहेत कारणे

सिमेंट काँक्रिटमुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरत नाही
अतिक्रमणामुळे नाले व ओढे अरुंद झाले आहेत
पावसाळी गटारांची कमी क्षमता व अर्धवट कामे
रस्त्यावरील कचरा, माती, दगड व्यवस्थित न उचलणे
रस्त्याच्या समपातळीवर चेंबर नसणे
कचर्‍यासह माती वाहून आल्याने पावसाळी गटारासह, चेंबर तुंबणे

या भागांत साचते पावसाचे पाणी

सिंहगड रस्ता (राजाराम पूल चौक, इनामदार चौक-विठ्ठलवाडी, आनंदनगर चौक, वडगाव पुलाखाली), धायरी, नर्‍हे-मानाजीनगर
भुयारी मार्ग, आंबेगाव, कोथरूड डेपो, कात्रज, कोंढवा रस्ता, राजस सोसायटी चौक, सातारा रस्ता, स्वामी विवेकानंद चौक, खराडी, विमाननगर, लोहगाव, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, महेश सोसायटी चौक

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT