नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी बैठक हा एक फार्स असून, गेल्या पाच वर्षांत मराठा समाजाच्या किमान 28 लाख लोकांना मराठवाड्यात गुपचूप सरसकट ओबीसी प्रमाणपत्रांचे गैरमार्गाने वाटप झाले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतले असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला.
विशेष म्हणजे, गेल्या दीड-दोन वर्षात यातील निम्म्या प्रमाणपत्रांचे काम वेगाने झाले. या प्रकाराची 'एसआयटी' चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
एकीकडे सरकार जनतेला मराठा-ओबीसी, असे आपसात झुंजवत ठेवते आणि दुसरीकडे गुपचूपपणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम करत आहे. याप्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. विशेषतः, बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवून नोकर्या लाटणार्यांची 'एसआयटी' चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.