पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांना वीज, पाणी, पूर, आवर्षण यांचे व्यवस्थापन करताना तारेवरची कसरत होते. त्यावर सर्वंकश उपाय शोधून पुण्यातील सी-डॅक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी स्मार्ट फार्म सिस्टीम नावाचे छोटेसे यंत्र तयार केले आहे. याद्वारे आता शेतकर्यांना त्यांच्या मोबाईल अॅपवरून स्मार्ट शेती करणे शक्य होणार असल्याचा दावा येथील शास्त्रज्ञांनी केला आहे.
गुढीपाडव्याला सी-डॅकचा स्थापना दिवस असतो. यंदा संस्थेचा आज मंगळवारी (दि. 9 एप्रिल) संस्थेचा 37 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील सी-डॅकचे संचालक कर्नल ए. के. नाथ यांनी या नव्या संशोधनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, स्मार्ट फार्म डिव्हाईस हे छोटेसे यंत्र आहे. त्यावर छोटासा पडदा असून, त्याद्वारे तुम्हाला शेतात पाणी कधी द्यायचे, मातीचा पोत कसा आहे. पिकाखालची आर्द्रता, पावसाचा अंदाज, पूर, आवर्षण स्थिती या सर्वच बाबींचा हे यंत्र अंदाज देईल. हे यंत्र सी-डॅक त्रिवेंद्रममधील शास्त्रज्ञ अनिष सत्या यांनी तयार केले आहे.
या यंत्राचे उद्घाटन आज होणार आहे. याबाबत माहिती देताना शास्त्रज्ञ अनिष सत्या म्हणाले, तीन वर्षे संशोधन करून हे यंत्र तयार केले आहे. बाजारात अशी यंत्रे आहेत, त्याची किंमत एक ते दीड लाख इतकी आहे. मात्र, हे यंत्र 15 हजार ते पन्नास हजार या किमतीत मिळू शकते. केरळ राज्यात यावर प्रयोग झाले असून, शेतकर्यांसाठी लागणार्या माहितीच्या सर्व
ट्रायल पूर्ण झाल्या आहेत.
शेतकर्यांच्या पीक पद्धतीनुसार हे यंत्र पिकांची माहिती, त्यासाठी आवश्यक सूचना व मदत करणार आहे. यात 1 ते 33 सेन्सरचे यंत्र बसवता येते. मात्र, शेतकर्यांसाठी किमान दोन किंवा तीन सेन्सरचे यंत्र पुरेसे आहे. हे छोटेसे यंत्र मोबाईल अॅपवरून चावलता येईल, शेतात न जाता तुम्हाला मोबाईलवरून शेतातील पिकाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
– अनिष सत्या, शास्त्रज्ञ, सी-डॅक, त्रिवेंद्रम
हेही वाचा