पुणे : पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका स्थानिकसह दोन भाषांमध्ये देण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत. या संदर्भातील परिपत्रक 'एआयसीटीई'ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. भारतीय भाषांतून तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'एआयसीटीई'कडून अभियांत्रिकी पदवीपूर्व आणि पदविका अभ्यासक्रमांना जागा वाढवून दिल्या जात आहेत. भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतल्याचा वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो, असे 'एआयसीईटी'ने नमूद केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसते. भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतल्यामुळे भाषा हा ज्ञान आणि कौशल्यात अडथळा ठरणार नाही. भाषेवरील प्रभुत्वाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर लक्षणीय परिणाम होतो. प्रश्नपत्रिकेत आता स्थानिक भाषेत प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना सहजपणे समजून घेऊन परिणामकारक पद्धतीने उत्तर देता येईल. भारतीय भाषा ही कोणत्याही व्यक्तीची सांस्कृतिक ओळख असते.
पदवीस्तरावर अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांत स्थानिक भाषेचा स्वीकार केल्यास पदवी अभ्यासक्रमांच्या पटनोंदणीतही वाढ होईल, अशी केंद्र सरकारला आशा आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा