पुणे : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने स्वारगेट परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून चार पीडित तरुणींची सुटका केली. पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण थिएटर चौकातील आकृती चेम्बर्समधील श्रेया आयुर्वेदिक स्पा सेंटरमध्ये हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिस हवालदार हणमंत कांबळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिता मांजरे (वय 26, रा. कात्रज) या स्पाचालक महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील आणि त्यांच्या पथकाला स्वारगेट येथील श्रेया आयुर्वेदिक स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली असता हा प्रकार येथे सुरू असल्याचे समजले. त्यानंतर साध्या वेशात छापा टाकला असता चार पीडित मुली तेथे मिळून आल्या.
आरोपी महिला अनिता ही त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत होती. या वेळी 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पीडित तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे करीत आहेत.
हेही वाचा