पुणे : पुढारी वृत्तसेवा : ललित पाटील पलायन प्रकरणात अटक करण्यात आलेला येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय 44) याला अमलीपदार्थ तस्कर अभिषेक बलकवडे याने पैसे दिल्याचे उघड झाले आहे. तसेच, ललित ससूनमध्ये असताना इंगळे त्याच्याशी आणि भूषण पाटीलदेखील संपर्कात होता, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. त्याला न्यायालयाने 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयातील महेंद्र शेवते आणि कारागृह पोलिस दलातील मोईस शेखला अटक केली होती. तर, इंगळेला मंगळवारी उशिरा अटक केली. त्यामुळे त्याला बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. इंगळे हा येरवडा कारागृहात समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. ललित ससूनमध्ये असताना तो त्याच्या संपर्कात होता.
त्याने बलकवडेकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. ते पैसे का घेतले, ते कोठून आणले, अमलीपदार्थ विक्रीतून ते पैसे जमा केले होते का, आदी सर्व गोष्टींचा सखोल तपास करायचा असल्याने अॅड. इथापे-यादव यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याच्या प्रकरणात ललित पाटील तसेच त्याचा चालक सचिन वाघ याला पुणे पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
वाघ याला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे ललितसोबत अटक केली होती. सचिन हा मूळचा नाशिकचा आहे. ससूनमधून ललित पळून गेल्यानंतर वाघ याने त्याला मदत केली. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयात प्रोडक्शन वॉरंट सादर करून पुणे पोलिसांनी वाघला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ललित आणि वाघ यांनी पळून जाण्यासाठी काय शक्कल वापरली, त्या अगोदर त्यांचा कट कसा शिजला, याची यामध्ये प्रामुख्याने चौकशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा