पुणे

बिल्डरला क्लिन चीट: येरवडा स्लॅब दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार, सल्लागार दोषी

अमृता चौगुले

पांडुरंग सांडभोर

पुणे : येरवडा येथील स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेच्या चौकशीत बांधकाम व्यावसायिकाला क्लिन चीट मिळाली आहे, तर लोखंडी सळ्यांमध्ये घोड्या (चेअर्स) चुकीच्या व अपुर्‍या प्रमाणात बसविल्याचा ठपका ठेवत प्रकल्प ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येरवडा फायनल प्लॉट- 3 येथील ब्लू ग्रास बिझनेस पार्क इमारतीचा बांधकाम प्रकल्पाच्या पायाच्या बांधकामातील लोखंडी सळ्यांचा स्लॅब कोसळला होता.

या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अंतिम अहवाल नुकताच सादर झाला असून, त्यात या घटनेच्या चौकशीत संबंधित प्रकल्पाचे मालक व विकसक फारुक वाडिया यांनी नियमानुसार प्रकल्पासाठी योग्य तंत्रज्ञ, परवानाधारक अभियंता, स्ट्रक्चरल डिझाईनर व साईट इंजिनिअर यांची नेमणूक केली होती. वाडिया यांनी त्यांच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडल्याचे चौकशी समितीने स्पष्ट केले आहे.

म्हणून ठेकेदार व व्यवस्थापन सल्लागार दोषी-

या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्पाचे ठेकेदार अहलुवालिया इंडिया प्रा. लि. व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कुशमन अ‍ॅड विकफिल्ड यांना संयुक्तरीत्या जबाबदार धरण्यात आले आहे. प्रामुख्याने ही दुर्घटना लोखंडी जाळ्यांमध्ये चेअर्स चुकीच्या व अपुर्‍या प्रमाणात बसविल्याने तसेच याबाबत योग्य नियंत्रण व तपासणी कार्यपध्दती नसल्याने घडली असल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार स्पष्ट होत आहे. यासंबंधीची खबरदारी घेण्याची जबाबदारी ठेकेदार आणि व्यवस्थापन सल्लागार यांची होती, म्हणून त्यांना दोषी धरण्यात आले असून त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

या कारणांमुळे घडली दुर्घटना

  • लोखंडी जाळी सुटी केल्यानंतर एकही स्टूल बांधण्यात आले नाही
  • 130 स्टूल टाकणे आवश्यक असताना फक्त 14 स्टूल टाकण्यात आले.
  • राफ्ट फाउंडेशनच्या उभारणीबाबत योग्य तांत्रिक तपासणी केलेली नव्हती.
  • बांधकामाकडे जाणार्‍या रस्त्याला संरक्षक कठडे नव्हते.
  • राफ्टमधील सळया खुल्या सोडल्याचे निदर्शनास आले
  • वरची आणि खालची जाळी स्थिर ठेवण्यासाठी नियोजन, संकल्पना व कार्यान्वित नव्हती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT