नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्रित लढणार | पुढारी

नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्रित लढणार

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी करून एकत्रित लढण्याचा निर्णय आज मंगळवारी 24 मे रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतला. सानपाड्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढविण्याचे आज जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह महत्त्वाचे पदधिकारी उपस्थित होते. विद्यमान नगसेवकांना प्राधान्याने उमेदवारी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. केवळ आरक्षण बदलल्यास त्या जागेचा पुढे विचार केला जाईल.

31 मे रोजी आरक्षणाची सोडत असून त्यानंतर प्रभागांचे नियोजन केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर झालेला निर्णय आता पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर अहवाल सादर केला जाणार असून पुढील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली, त्यानुसार नवी मुंबई महाविकास आघाडीतील स्थानिक नेते काम करतील.

भाजपचा महापालिकेवर असलेला झेंडा उतरविण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय कार्यक्रमांचे नियोजन करण्याची तयारी आता महाविकास आघाडीने सुरू केली आहे. जागावाटपाबाबत आताच कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितले. मात्र निवडणुकीत महाविकास आघाडी भाजपला धोबीपछाड घालणार हे निश्चित असल्याचे ते म्हणाले.

Back to top button