पुणे

नागरी सहकारी बँकांनी मार्केटिंगमध्ये उतरावे : सहकार आयुक्तांची अपेक्षा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नागरी सहकारी बँकांमध्ये येऊन ग्राहक कर्ज घेणे, ठेव ठेवणे असे व्यवहार यापुढे कमी होणार असून, सहकारी बँकांनी काळानुरूप ग्राहकांपर्यंत पोहोचून व्यवसायाभिमुखता बाळगण्याची आवश्यकता आहे. चांगले कर्जदार मिळविणे हे बँकिंगपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्याद़ृष्टीने सहकारी बँकांनी छोट्या कर्जदारांपर्यंत पोहोचून बँकिंग व्यवसायवाढीसाठी मार्केटिंग करणे आवश्यक असल्याचे मत सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले.

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा 45वा वर्धापन दिन असोसिएशनच्या कार्यालयात सोमवारी (दि. 20) सायंकाळी केक कापून कोतमिरे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. या वेळी असोसिएशनच्या 'बँकिंग आशय अभिप्राय' या मासिकाच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले व अन्य संचालक मंडळ आणि विविध बँकांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

बँकांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मिळणे जसे अवघड झाले आहे, त्याचप्रमाणे बँकांमधील संचालक मंडळेही रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आठ वर्षे पूर्ण केल्यानंतर पुन्हा या क्षेत्रात दिसणार नाहीत. 2020 हा बदल होऊन पाच वर्षे होत असताना आपण पुढची पिढी तयार करण्यासाठी नेमके काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत कोतमिरे यांनी बँकांच्या प्रतिनिधींनी त्यासाठी निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे नमूद केले. अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी असोसिएशनच्या 45 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत बँकिंगच्या अडचणींवर ऊहापोह केला. बँकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अधिकार्‍यांची वाणवा आहे. त्यादृष्टीने पुणे विद्यापीठाबरोबर करार करून पदवी अभ्यासक्रमाचे काम पूर्ण केले आहे. बँकांनी निवडलेले अधिकारी पहिल्या वर्षी 30 विद्यार्थी असतील. असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल कारंजकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले यांनी आभार मानले.

सॅफच्या निर्बंधातून 25 बँका बाहेर

रिझर्व्ह बँकेच्या सुपरवायझरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्क अर्थातच सॅफअंतर्गत काही निर्बंध असलेल्या 212 बँकांपैकी 31 मार्च 2023 अखेर 25 बँका बाहेर आल्या आहेत. त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आरबीआयने सॅफचे निर्बंध हटविले आहेत. राज्यातील 437 पैकी 212 बँकांवर सॅफचे निर्बंध आहेत. मात्र, सर्वांच्याच सांघिक प्रयत्न आणि नियोजनातून उर्वरित बँकांवरील निर्बंधही निश्चित हटतील, असा विश्वास कोतमिरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT