Chaskaman Dam Pudhari
पुणे

Chaskaman Dam Water Discharge: चासकमान धरण ९५.६४ टक्के भरले; भीमा नदीत ३८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; धरणाचे पाच दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भिमाशंकर अभयारण्यासह चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पडत असलेल्या पावसाने ८.५४ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ९५.६४ टक्के म्हणजेच एकूण ८.१७ टी एमसी भरले. धरणात उपयुक्त जलसाठा ७.२२ टीएमसी आहे.

पाणलोट क्षेत्रांत पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच असल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहित धरून बुधवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी २० सेटिमिटरने उचलून धरणाच्या सांडव्याद्वारे ३५०० क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या डावा कालव्याद्वारे नियंत्रित पद्धतीने ३०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. असे एकूण चासकमान धरणातून ३८०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.

मागील वर्षे प्रथमच दि. ७ जुलै रोजी ८०.८९ टक्के म्हणजेच एकूण ७.०८८ टीएमसी धरण भरण्याचा धरणाने बहुमान पटकवला होता. म्हणजेच मागील वर्षेच्या तुलनेने या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस उशिरा सुरू होऊन काहीशी दडी मारून विश्रांती घेतल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार धरणाच्या सांडव्याद्वारे १४ दिवस विसर्ग सोडण्यास उशिर झाला आहे.

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील दमदार बँटिंग वगळता अधूनमधून रिपरिप सुरूच असून पाणलोट क्षेत्रांत मागील २४ तासांत ३४ मिलिमीटर तर १ जूनपासून एकूण ५७७ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी पाणलोट क्षेत्रांतील ओढे-नाले प्रवाहित झाले असून खळाळून वहात आहे. चासकमान धरणाच्या वरिल बाजूस असणारे कळमोडी धरण दि. ६ जुलै रोजी भरून संपूर्ण पाणी चासकमान धरणात येत असून भीमा व आरळा नदीद्वारे चासकमान धरणात सरासरी ७१६१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे.

धरणाच्या साखळीत अधूनमधून पावसाची बँटिंग सुरूच असून धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी येणाऱ्या येव्यानुसार विसर्गात मोठी वाढही होऊ शकते. यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्या चासकमान धरणाची पाणी पातळी ६४९.०० दशलक्ष घनमीटर आहे. एकूण साठा २३२.३४ दशलक्ष घनमीटर आहे, तर उपयुक्त साठा २०५.१५ दशलक्ष घनमीटर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT