अविनाश दुधवडे
चाकण: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाकण परिसरातील समस्या सोडवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. 'पीएमआरडीए' कडून चाकणमधील विकासकामांच्या नुसत्या घोषणा होत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या प्राधिकरणाने या परिसरात चार मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगितले होते.
या कामासाठी एकूण २६१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, या मार्गांमुळे चाकण-तळेगाव चौक, तळेगाव आणि शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, त्या दृष्टीने काहीही केलेले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील उन्नत मार्ग होण्यासाठी काही वर्षांचा अवधी आहे. तो पर्यंत येथील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी 'पीएमआरडीए'ने चार मिसिंग लिंक तयार करण्याची घोषणा केली होती. एका वर्षांत मिसिंग लिंकचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असताना त्या दृष्टीने प्रशासनाचे काहीही ठोस प्रयत्न सुरू नसल्याचा येथील जनतेचा आरोप आहे.
पश्चिम बाह्यवळणाचा महत्त्वाचा टप्पा
पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाच यांना जोडणारा सुमारे ८५० मीटर लांबीचा आणि ६० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. पुढे तळेगाव एमआयडीसीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
रिंगरोडच्या कामाला गती देण्याची मागणी
पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या ही कामे धीम्या गतीने चाकण औद्योगिक भागात सुरू आहे. या रस्त्यामुळे याभागातील वाहतूक कोंडी दूर होऊन राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग याची थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव आणि मावळ तालुक्यातील परंदवाडी, ऊर्से, तळेगाव दाभाडे, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे, या गावांतून रिंगरोड जाणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूककोंडीतून मुक्तता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही कामे वेगाने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आहे.