PMPML Electric Bus Fire Pudhari
पुणे

PMPML Electric Bus Fire: चाकणमध्ये पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक बस पेटली; 50 प्रवाशांचे प्राण वाचले

निघोजे येथे महिंद्रा कंपनीसमोर धावत्या बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे (ता. खेड) हद्दीत शुक्रवारी (दि. 13) सकाळी महिंद्रा कंपनीसमोर प्रवाशांनी भरलेल्या पीएमपीएमएलच्या धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

ही घटना सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. प्राप्त होत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि काही वेळातच लाखो रुपयांची ही बस जागेवर जळून खाक झाली.

चाकण एमआयडीसी निघोजे-महाळुंगे मार्गावरून पीएमपीएमएल बस (एमएच 12 एसएफ 1388) शुक्रवारी (दि. 13) सकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस 8:45 वाजेच्या सुमारास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समोर आली असता अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. धुराचे लोट पाहताच चालकाने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि

संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आग शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अखेर निघोजे अग्निशमन विभाग आणि आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस आगीत खाक झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्रत्येक फेरीनंतर तपासणी गरजेची

चाकण औद्योगिक भागात कामगार मोठ्या प्रमाणावर अशा बसेस मधून प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे असते. बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असावीत आणि चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देणे बंधनकारक असते. धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा असणे अनिवार्य आहे, असे संबंधित घटना टाळण्यासाठी गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT