

पुणे: बँकॉकहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवलेला 5 कोटी 42 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा विमानतळावरील कस्टम (सीमाशुल्क) विभागाने जप्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याच्या बॉक्समध्ये हा गांजा तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 5 किलो 429 ग््रॉम हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त केला आहे.
याप्रकरणी मुंबईतील फरहान मोहम्मद अली शेख (वय 31) याला अटक करण्यात आली आली आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 11 फेबुवारी रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या या बँकॉक-पुणे विमानातून आलेल्या फरहान शेख या प्रवाशाच्या संशयित बॅगची तपासणी करण्यात आली. त्याच्या कपडे, चॉकलेट तसेच खेळण्याच्या बॉक्समध्ये संशयीतरीत्या कस्टम विभागाला 16 पाकिटे लपवली असल्याचे आढळून आले.
त्याची तपासणी केल्यानंतर तो भारतात बंदी असलेला हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. याचे वजन केले असता त्याचे वजन 5 किलो 429 ग््रॉम इतके आढळले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे साडेपाच कोटींच्या घरात असल्याचे कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर संबंधित प्रवाशाला 12 फेबुवारी रोजी पहाटे 6 वाजता अटक करण्यात आली. त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत हा अमलीपदार्थ भारतात बेकायदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून, याप्रकरणी विशेष सरकारी वकील ऋषिराज वाळवेकर यांनी काम पाहिले. संबंधित आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मागील काही कारवाया पाहता बँकॉक येथून चोरट्या मार्गाने हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.