संतोष शिंदे
पिंपरी(पुणे) : वडपूजनासाठी घराबाहेर गेलेल्या महिलेचा पाठलाग करीत चोरटे सोसायटीत घुसले. सुरक्षारक्षक आणि महिलांची गर्दी असतानाही चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. ही घटना पूर्णानगर, आकुर्डी येथे शनिवारी (दि. 3) घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच,
चेन चोरट्यांचे धाडसही वाढल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात रस्त्याने जाणार्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. शनिवारी आकुर्डी येथे सोसायटीत घुसून मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर 'पुढारी' ने मागील पाच महिन्यांचा आढावा घेतला असता 35 जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्याची पोलिस दप्तरी नोंद असल्याचे समोर आले. यामध्ये बहुतांश घटनांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे महिलांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पोलिसांना नामचीन टोळ्यांची मुस्कटदाबी करण्यात यश मिळाले. मात्र, 'स्ट्रीट क्राईम' रोखण्यात पोलिसांना अद्याप म्हणावे, असे यश मिळाले नाही. यामध्ये प्रामुख्याने सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावण्याच्या घटना हे सुरुवातीपासून पोलिसांसमोरचे एक मोठे आव्हान ठरत आहे.
मागील वर्षी जून 2022 मध्ये एकूण 46 ठिकाणी चेन चोरीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये आषाढीवारी दरम्यान देहू आणि आळंदी येथे घडलेल्या घटनांची संख्या मोठी होती. त्यामुळे आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्या दरम्यान चोरट्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे मास्टर प्लॅन असण्याची गरज आहे.
दुचाकीवर घिरट्या घालत असलेले चोरटे बसची वाट पाहत असलेल्या प्रवासी महिलांना टार्गेट करू लागले आहेत. महिलांच्या हातातील पर्स, लॅपटॉप, घड्याळ यासारख्या किमती वस्तू देखील हिसकावून नेल्याच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बस थांबा परिसरात पोलिसांची गस्त असणे
आवश्यक आहे.
मकरसंक्रांत, वटपौर्णिमेला पोलिसांची नाकाबंदी सुरू असते. पोलिस कर्मचारी पादचारी महिलांना दागिने पदराआड झाकून घेण्यास सांगतात. अशा वेळी महिला तेवढ्यापुरते ऐकल्यासारखे करत दागिने झाकून घेतात; मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर लगेचच पुन्हा दागिने दिसतील अशा पद्धतीने घालतात. त्यामुळे महिलांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांना आयती संधी मिळते.
शहर परिसरात मागील पाच महिन्यात 164 ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड असलेली पर्स यासह मौल्यवान वस्तू चोरटयांनी हिसकावून नेल्या आहेत. विशेष करून चोरटे मॉर्निंग वॉक करणार्या महिलांना टार्गेट करीत आहेत. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल असलेल्या चेन चोरीच्या 35 गुन्ह्यांपैकी केवळ 9 गुन्हे उघड आहेत. म्हणजेच चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण हे 26 टक्के इतकेच आहे. उर्वरित 73 टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील चेन चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांचा देखील तपास सुरू आहे. लवकरच यातील आरोपी जेरबंद होतील.
– पद्माकर घनवट,
सहायक पोलिस आयुक्त,
पिंपरी- चिंचवड
हेही वाचा