

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान, कन्यादान योजना, सूनमुख योजना, कर्जमर्यादेत वाढ, लाभांश वितरण, अशा विविध विषयांसह संस्थेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी जागा खरेदी करून, व्यापारी संकुल तसेच सभासदांच्या पाल्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची 96 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली.
अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे प्रमुख पाहुणे होते. प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रा. शिंदे यांचे व्याख्यान झाले. लांगोरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. चेअरमन संजय कडूस यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या सभेत कर्जमर्यादेत 2 लाखांची वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कन्यादान योजनेबरोबरच सभासदांच्या मुलांच्या लग्नात सूनमुख योजना राबविण्याचा, त्यात मुलीप्रमाणे मुलाच्या लग्नातही 5 हजार रुपये देण्याचा, तसेच सभासदपाल्य गुणगौरव योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जागाखरेदीच्या निर्णयाला सर्वच सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विरोधकांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे ही 'चेअरमन'नेच द्यावी, अशी काही सभासदांची मागणी होती. त्यामुळे पाच तास सुरू असलेल्या या सभेत संजय कडूस यांनी एकाकी खिंड लढवत सर्व प्रश्नांची सडेतोड, हजरजबाबीपणे व समाधानकारक उत्तरे दिल्याचे दिसले. यावेळी व्हा.चेअरमन भाऊसाहेब चांदणे, संचालक विलास शेळके, अरुण जोर्वेकर, कल्याण मुटकुळे, राजू दिघे यांच्यासह व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनीही बाजू मांडली.
सभेत विकास साळुंखे, अभय गट यांच्यासह संदीप अकोलकर, संदीप वाघमारे, विलास वाघ, शशिकांत रासकर, सोमनाथ भिटे, संदीप मुखेकर, डॉ.सुरेश ढवळे, आदिनाथ मोरे, मनोज घुमरे, नीलेश हराळ, संजय पाखले, छाया नन्नवरे, प्रवीण राऊत, किशोर फुलारी, विशाल महाजन, मनोहर डिसले, सचिन बनकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, ज्योती पवार, श्रीमती सुरेखा महारनूर, मनिषा साळवे, संतोष भैलुमे, योगेश पंडूरे, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे हजर होते.
या सभेत सभासदांचे लाभांश व कायम निधीवरील व्याजाची रक्कम सभासदांच्या बँक खाती जमा करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सभा शेवटच्या टप्प्यात असतानाच ही रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.