पुणे

शिंगव्यात पुन्हा आढळले बछडे

Laxman Dhenge

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गोरडेमळ्यात शनिवारी
(दि. 30) सकाळी ऊसतोडणी सुरू असताना तीन बिबट बछडे आढळून आले. वन विभाग व रेस्क्यू पथकाच्या सतर्कतेने अवघ्या दीड तासात तीनही बछडे पुन्हा मादीच्या कुशीत विसावले. ही घटना ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाली. या घटनेने गोरडेमळा व शिंगवे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गोरडेमळ्यात रोहिदास गोरडे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू आहे. शनिवारी सकाळी ऊसतोडणीला सुरू असताना साडेसातच्या सुमारास तीन बिबट बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगारांनी काम थांबविले. याबाबत भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ यांनी वन विभागाला बछडे आढळून आल्याची माहिती दिली. वन परिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडलाधिकारी प्रदीप कासारे, वनरक्षक बालाजी पोतरे, संपत भोर, शरद जाधव रेस्क्यू पथकाचे दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दहा वाजता तीनही बछड्यांना अलगदपणे ताब्यात घेतले. सव्वाअकराच्या सुमारास मादीने तीनही बछड्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलविले. हे बछडे 20 ते 25 दिवसांचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक शारदा राजगुरव व वन अधिकार्‍यांनी सांगितले.

सलग दुसर्‍या आठवड्यात बछडे आढळले

मागील आठवड्यात गुरुवारी (दि. 21) याच मळ्यात झुंबर गोरडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तीन बछडे आढळून आले होते. आता पुन्हा तेथेच बछडे आढळून आल्याने गोरडेमळा, शिंगवे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या वतीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT