

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. किवींच्या विजयात मिचेल सँटनर आणि जिमी नीशम यांच्यातील 46 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय किवी गोलंदाजांनी योग्य ठरवत बांगलादेशचा संघ 19.2 षटकात 110 धावांवर ऑलआऊट केला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 17 धावा केल्या. तौहीदने 16, अफिफ हुसेनने 14, तर रिशाद हुसेन आणि रॉनी तालुकदारने 10-10 धावा केल्या. शमीम हुसेन नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि तनवीर इस्लामने आठ धावा केल्या. सौम्या सरकार आणि मेहदी हसन यांना प्रत्येकी केवळ चार धावा करता आल्या.
माउंट मौनगानुईमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. टीम साऊदी, बेन सियर्स आणि अॅडम मिल्ने यांनी सुरुवातीला प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर कर्णधार सँटनरने धुमाकूळ घातला आणि चार बळी घेतले. यादरम्यान त्याने चार षटकात केवळ 16 धावा दिल्या. सौदी, सियर्स आणि मिल्ने यांनाही शेवटी प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आले.
111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 14.4 षटकात 5 विकेट गमावत 95 धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे खेळ पुढे जाऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडने हा सामना 17 धावांनी जिंकला. किवी संघाकडून फिन ऍलनने सर्वाधिक 38 धावा केल्या. जेम्स नीशम 28 आणि मिचेल सँटनर 18 धावांवर नाबाद राहिले. टीम सेफर्ट, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी एकच धाव करता आली. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि शरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.