

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवं वर्ष २०२४ स्वच्छतेचा एक महासंकल्प घेऊन येणार आहे. गेट-वे-ऑफ इंडियावरून सुरू होणारं हे अभियान राज्यासाठी आरोग्यदायी, सुख, समृद्धी आणि संपन्नतेचं महाद्वार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते आज (दि.३१) 'महास्वच्छता' अभियानाचा शुभारंभावेळी बोलत होते. (Mahaswachhata campaign)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दि.३१) सकाळी 'महास्वच्छता' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतादूतांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. Mahaswachhata campaign)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून नकारात्मक, अस्वच्छ आणि घाण मुळापासून धुवून काढणार आहोत. हे स्वच्छता अभियान आता जनतेचं अभियान आहे. मुख्यमंत्री किंवा महापालिकेचं हे अभियान नाही ही एक लोकचळवळ झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. (Mahaswachhata campaign)
नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. अवघे काही तास राहिलेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना सगळ्या वाईट, गोष्टी-आठवणी, घाण, कचरा… अस्वच्छता सगळं आपल्याला दूर करायचंय…नवं कोरं, पवित्र आणि निर्मळ आयुष्याचं उत्साहानं स्वागत करायचं आहे. नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच, येणारं वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, या शुभेच्छा, देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 'अर्बन फॉरेस्ट'ची संकल्पना राबविण्याचा आमचा मानस असून, ठाण्यात अशा प्रकारच्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
महास्वच्छतेच्या या महाजागरातून आपल्याला परिवर्तन घडवायचंय आहे. महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी. सदृढ आणि बलशाली करायचा आहे. अस्वच्छतेविरोधातील या लढाईत आपले स्वच्छतादूत, आपले सफाई कामगार-कर्मचारी बंधू-भगिनी हेच खरे हिरो आहेत. ते त्यांच काम करतीलच; पण आपल्यालाही त्यांना साथ द्यायचीय आहे. त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरवितो आहोत, सफाई कामगारांचा ५ लाख रुपयांचा विमा काढला आहे, त्यांच्या मुलांच्या विदेशी शिक्षणासाठी योजना महापालिका आणतेय. सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करीत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.