पुणे

अबब… बैलांच्या किमती आलिशान मोटारींपेक्षा जास्त!

अमृता चौगुले

अविनाश दुधवडे

चाकण : ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या यात्रा-जत्रांमध्ये पुन्हा एकदा 'भिर्रर झाली, उचल की टाक…'चा आवाज घुमत आहे. बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर शर्यतीच्या बैलांना प्रचंड मागणी वाढली आहे. सुंदर, देखणे शर्यतीचे खोंड आता कमीत कमी टाटांच्या नॅनोपासून ते अगदी आलिशान सफारी अशा महागड्या चारचाकी मोटारींच्या किमतीएवढा महाग झाला आहे; किंबहुना त्यांच्या किमतीसदेखील त्याने पिछाडीवर टाकले आहे.

ग्रामीण भागात बैलगाडामालक असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. गेल्या काही वर्षांत बैलगाडा शर्यतबंदीमुळे यात्रांचे मुख्य आकर्षणच नाहीसे झाले होते. आता ही बंदी हटल्याने पुन्हा गावाकडच्या यात्रांमधून 'भिर्रर झाली, उचल की टाक…' हा नेहमीचा घाटातील सूर कानी पडत आहे. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर व गोहत्याबंदीनंतर चाकण येथील सर्वांत मोठ्या गुरांच्या बाजारात बैलांच्या किमती कमी झाल्या होत्या व आवकेवरही परिणाम झाला होता. शर्यतीचे बैल केवळ शोभेचे झाले होते.

बैलगाडा शर्यतबंदी उठल्याने चाकण येथील बैलबाजारात कमी झालेल्या बैलांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. बंदी उठल्याने खास शर्यतीच्या बैलांना येथे मागणी वाढली असून, विविध जातींचे बैल येथे विक्रीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. चाकण येथील बैलबाजारात शर्यतींच्या खिल्लार जातीच्या बैलांना सरासरी 50 हजार ते 2 लाख एवढी किंमत मिळत आहे. कर्नाटकसह अन्य राज्यांतून खास शर्यतीचे बैल खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात मागविले जात आहेत. गावरान, माणदेशी, म्हैसूर, खिल्लार जातीच्या खास शर्यतीच्या खोंडांना मोठी मागणी आहे. "आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत" या उक्तीप्रमाणे शर्यतीच्या या खास बैलांना शौकीन मंडळी 10 ते 20 लाख रुपयांची बोली लावून खरेदी करीत आहेत.

गुपचूप मोजतात 'वाट्टेल ती' किंमत

शर्यतबंदी उठल्यानंतर पूर्वी केवळ हजारांत असणारी या भागातील सर्वाधिक प्रचलित खिल्लार बैलांची किंमत लाखांच्या घरात पोहचल्याने शर्यतशौकिनांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. मात्र, शर्यतीचा नाद पूर्ण करण्यासाठी शौकीनही बैलांसाठी गुपचूप 'वाट्टेल ती' किंमत मोजत आहेत.

नावाजलेल्या बैलांची गोठ्यावरच ठरते किंमत

अत्यंत महागड्या या बैलांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समितीच्या आवाराबाहेर थेट शेतकर्‍यांच्या गोठ्यावर होत आहेत. विशेष म्हणजे, बैलगाडा घाटात वेगात धावलेल्या आणि नावाजलेल्या बैलांना शौकीन मंडळी 20 ते 25 लाख रुपये अशा वाट्टेल त्या किमतीला खरेदी करीत आहेत.

बैलांच्या किमती चौपट

यंदा वैरण, चारा, पाण्याचा प्रश्न बिकट आहे; शिवाय मजूर मिळत नसल्याने दिवसेंदिवस शेतकरी इतर जनावरे ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात गुरांची संख्या कमी होत असून, परिणामी शर्यतीच्या बैलांसोबतच शेतीत राबणार्‍या बैलांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर जनजीवन सुरळीत झाल्याने बैलबाजारात मोठी उलढाल होत आहे. चाकण या राज्यातील प्रसिद्ध असलेल्या बैलबाजारामध्ये बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यामध्ये खास शर्यतीच्या काही बैलांच्या किमती चौपट-पाचपट वाढल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT