BSNL Pudhari
पुणे

BSNL VRS Employees Dues: सात वर्षांच्या संघर्षाला यश; बीएसएनएलच्या १८३ कर्मचाऱ्यांना अखेर मिळाला हक्काचा पैसा!

जात पडताळणीच्या अटीमुळे रखडलेली लाखोंची देयके खात्यात जमा; स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सुनील कडूसकर

पुणे: भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) स्वेच्छानिवृत्ती योजनेत सहभागी होऊनही गेल्या सात वर्षांपासून आपल्या हक्काच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जमातीच्या १८३ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला. बीएसएनएलचे मुख्य सरव्यवस्थापक (सीजीएम) डॉ. मनीष शुक्ला यांनी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सच्या (डीओटी) सल्ल्याने जात पडताळणी प्रमाणपत्राच्या या अटीतून मार्ग काढून संबंधित कर्मचाऱ्यांच्या देय रकमा त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रदीर्घ संघर्षानंतर या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

२०१९ मध्ये बीएसएनएलने कर्मचारी कपातीच्या उद्देशाने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. या योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४२ महिन्यांचे वेतन बक्षीस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्या वेळी देशभरातून सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांनी या योजनेचा स्वीकार करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यात महाराष्ट्रातील अकराशे कर्मचारी होते. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मात्र योजनेतील लाभांच्या रकमेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली. तब्बल ४० वर्षांपूर्वी बीएसएनएलच्या सेवेत दाखल झालेल्या या कर्मचाऱ्यांसाठी ही अट मोठी अडचण ठरली. विविध कारणांमुळे १८३ कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे शक्य झाले नाही. परिणामी, त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची देय रक्कम रखडली.

बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन व एआयबीडीपीए या संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. संघटनेचे अध्यक्ष नागेशकुमार नलावडे, महंमद जकाती, संदीप गुळुंजकर, गणेश हिंगे, सुनील चौधरी आदींसह अनेक नेत्यांनी त्यासाठी आंदोलने, उपोषणे करीत विविध स्तरांवर चर्चा व निवेदने देत या प्रश्नाचा पाठपुरावा केला; अखेर या संघर्षाला यश आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची रखडलेली लाखो रुपयांची रक्कम अखेर त्यांच्या खात्यात जमा झाली.

बीएसएनएलचे मुख्य सरव्यवस्थापक शुक्ला, प्रिन्सिपल जनरल मॅनेजर (पीजीएम) सुनीलकुमार निरानियन आणि सतीश चंद्र झा (सीसीए) यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अध्यक्ष नागेश नलावडे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून इन्स्पेक्शन क्वॉर्टरसाठी (आयक्यू) संघटनेच्या वतीने मोठी भेटही देण्यात आली.

मदतीची परतफेड इतरांना मदत करून करा...

आंदोलन काळात दिवंगत झालेल्या १५ पीडित कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या काळात पीडितांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांबाबतची मनोगते ऐकताना उपस्थितांसोबत सरव्यवस्थापक शुक्ला यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. या सर्व पीडित कर्मचाऱ्यांना पूर्ण निवृत्तिवेतनाबरोबरच निवृत्तीचे इतर सर्व लाभ तातडीने देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मदतीची परतफेड आभार, कृतज्ञता वा सत्काराने नव्हे, तर इतरांना मदत करून करा, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT