पुणे

‘बीएसआय’ने शोधली अस्थमावरील रामबाण औषधी

अमृता चौगुले

दिनेश गुप्ता

पुणे : पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (बीएसआय) अस्थमावरील अंतमूळ (टालोफ्लोरा अस्थमॅटिका) नावाची रामबाण औषधी वनस्पती केवळ शोधली नाही, तर तिचे जतन करून रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील नामवंत डॉक्टर या संस्थेच्या नावाने प्रिस्क्रिप्शन देऊन हे औषध रुग्णांना घेण्यास संस्थेत पाठवीत आहेत.

शहरात भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे (बीएसआय) 60 वर्षे जुने कार्यालय आहे. आवारात शिरताच सुंदर व दुर्मीळ वनस्पतींचे जंगल तुमचे स्वागत करते. पण, येथे नेमक्या कोणत्या वनस्पती आहेत, याची माहिती फक्त येथील शास्त्रज्ञांनाच आहे. बीएसआयमध्ये अस्थमावरील औषध मिळते, याची माहिती मिळताच आम्ही संस्थेचे संचालक डॉ. ए. बेन्नीयामीन यांची भेट घेतली. त्यांनी या औषधीवर संशोधन करणार्‍या डॉ. सी. आर. जाधव यांच्याकडे पाठविले आणि अस्थमावरील रामबाण औषधीची ओळख झाली.

वेलवर्गीय बहुगुणी वनस्पती…

डॉ. जाधव यांनी सांगितले की, अंतमूळ हे आयुर्वेदातील नाव आहे. हिचे वनस्पतीशास्त्रातील नाव 'टायलोफ्लोरा अस्थमॅटिका' असून मराठीत अंतमूळ, पीतमारी या नावाने ओळखली जाते. ही वनस्पती दम्यासह त्वचा व संधिवातावर गुणकारी आहे. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे श्वासनलिका रुंदावण्याचे गुणधर्म यात असल्याचे वनस्पतीची क्लिनिकल ट्रायल केल्यावर स्पष्ट झाले आहे.

काय आहे वनस्पतीत..?

या वनस्पतीमध्ये टायलोफ्लोरिन नावाचे अल्कलॉइड हे औषधी रसायन आहे. अनेक क्लिनिकल ट्रायनलमध्ये याचा वापर नेमका कशासाठी करावा, हे कळले. यात अस्थमा आजारावर ही वनस्पती प्रभावी असल्याचे सिध्द झाले. औषधी कंपन्यांनी या वनस्पतीच्या पानांचा काढा प्रमाणित केला असून, यात 1 टक्का इतके अल्कलॉइड असते.

अंतमूळ औषधीची पाने अगदी सहज कुणालाही या ठिकाणी दिली जात नाहीत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार केवळ पाच ते आठ पाने दिली जातात. तीदेखील कार्यालयप्रमुख किंवा उद्यान प्रभारी यांच्या परवानगीनेच. यातही रुगणाने त्याच्या जबाबदारीवर घ्यावयाची असतात.

– डॉ. सी. आर. जाधव, वनस्पती तज्ज्ञ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT