तेजवाणी, ‌‘अमेडिया‌’ कंपनीचा संबंध नाही Pudhari
पुणे

Bopodi Land Scam: तेजवाणी, ‌‘अमेडिया‌’ कंपनीचा संबंध नाही

बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांचे स्पष्टीकरण; पुणे पोलिसांकडून मुंढवा प्रकरणाची चौकशी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीचा संबंध नसल्याचा खुलासा पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चौकशी येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.(Latest Pune News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा भागातील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातंर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌‘जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणाच्या तपासात महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी महसूल विभागाकडून काही कागदपत्रे मागविली आहेत. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणाशी संबंध नाही‌’, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी स्पष्ट केले.

या दोन्ही प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले हे आरोपी आहेत. त्याअनुषंगाने तपास केला जाणार आहे. बोपोडीतील जमीन व्यवहाराची नोंदणी छत्रपती शिवाजी रस्त्यावरील तहसीलदार कार्यालयात झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार येवले यांनी संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात शासकीय चौकशी करण्यात अली असून, येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनााची फसवणूक केल्याप्रकरणी बोपोडी प्रकरणात सहा जणांच्या विरुद्ध तर मुंढवा प्रकरणात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मासाळ यांनी सांगितले.

गुन्ह्याच्या तपासासाठी पथके

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याअनुंषगाने स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे, बदलत गेलेल्या नोंदी, तसेच अन्य कागदपत्रे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क, महसूल विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तपासाच्या अनुषंगाने कागदपत्रे देण्याची विनंती करण्यात आली आहे.

दोन प्रकरणे एकाच गुन्ह्यात घेतल्याने गोंधळ

सरकारी मिळकतीच्या बाबातीत बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून, खडक पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नऊ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. परंतु या एकाच गुन्ह्यात दोन जमीन गैरव्यवहाराची प्रकरणे घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी स्पष्टीकरण देत मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणे वेगळी असल्याचे सांगितले आहेत.

पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनीचे संचालक मेसर्स दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांचा बोपोडी प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. परंतु या दोन्ही प्रकरणात तहसीलदार सूर्यंकांत येवले हे सहभागी आहेत. दोन दिवसांच्या गोंधळानंतर पुणे पोलिसांना अमेडिया कंपनीचा बोपोडी जमीन विक्री व्यवहाराशी काही संबंध साक्षात्कार झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT