

आबाजी पोखरकर
पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात मानवी-बिबट संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. अलीकडच्या काळात येथे बिबट्याच्या तीन गंभीर हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि दहशत वाढली आहे. वन विभागाने एक नरभक्षक बिबट्या ठार केला, काहींना पकडले तरी परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी उलट भय वाढले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांत सुमारे 2,000हून अधिक बिबटे असल्याचा अंदाज वर्तविला जातो. मुख्यतः ऊसशेत आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे अनुकूल अधिवास मिळत आहे. त्यामुळे बिबट्यांचे प्रजनन झपाट्याने वाढले आहे. नर व मादीचे प्रमाण जवळपास समप्रमाणात असल्याने स्थिर वर्धनाची शक्यता अधिक आहे.(Latest Pune News)
सुरक्षित अधिवास आणि अपुरी रेस्क्यू यंत्रणा ही दोन्ही कारणे एकत्र आल्याने क्षेत्रात ‘बिबटमुक्त’ परिसर करण्याचे आव्हान मोठे राहिले आहे.
वन विभागाने सध्या 30 ते 40 पिंजऱ्यांचे जाळे रचण्याचे काम सुरू केले असले तरी गेल्या सात दिवसांत कुठल्याही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही; फक्त काही घटनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी बिबटे पकडण्यात आले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मानवी वस्तींचे अतिक्रमण आणि ऊसशेतीचे जाळे बिबट्यांना सुरक्षित आश्रय देत आहेत. यामुळे जंगला बाहेरचा बिबट वावर कायमस्वरूपी कमी करणे कठीण झाले आहे.
पिंपरखेड येथे अलीकडे एका नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले, तर दुसरीकडे एक मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आली. या घटनांनी ग््राामस्थांना तात्पुरता दिलासा दिला आहे. तरीही स्थानिकांची मुख्य तक्रार अपुरे मनुष्यबळ, कमी तांत्रिक साधने आणि जलद गतीने काम न होण्याचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंजरे सज्ज ठेवण्यासाठी सव्वाअकरा कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा झाली असूनही रेस्क्यू कार्य हळूहळू होत असल्याचे नागरिक आणि वनतज्ज्ञ दोघेही मान्य करतात.
ऊसशेतात लपलेल्या बिबट्यांना शोधणे व सुरक्षितपणे बेशुद्ध करून पिंजऱ्यात भर करणे ही प्रक्रिया अवघड आहे. डार्टचा नेम चुकल्यास बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो. पिंपरखेड येथील नरभक्षक प्रकरणात हेच प्रतिबिंबित झाले. तसेच ड्रोन आणि एआय-आधारित सायरन सिस्टीम सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत; परंतु सर्व ठिकाणी या उपकरणांची उपलब्धता आणि कार्यक्षमता अभावी तातडीचा फायदा मिळत नाही.