Law Pudhari
पुणे

Bopdev Ghat Case: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार खटला; हॉटेलमालकाची न्यायालयात साक्ष

आतापर्यंत ११ साक्षीदार तपासले; मंगळवारी वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात सोमवारी (दि. ३१) एका हॉटेलमालकाची विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. आरोपी चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया हा आपल्या हॉटेलमध्ये कामाला होता, तसेच तो कुठे राहत होता, याबाबत हॉटेलमालकाने न्यायालयात माहिती दिली. या खटल्यात आतापर्यंत ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून, मंगळवारी (दि. १) वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष होणार आहे.

बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय २७), चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०) आणि बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावी (वय ३३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील सामूहिक बलात्कार, बळजबरीने डांबून ठेवणे, दुखापत करणे, जबरी चोरी आणि धमकावणे यासह शस्त्र कायद्यातील कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. मागील सुनावणीत पंचाची साक्ष नोंदविण्यात आली होती.

आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटात कसे आले, त्यांनी मद्यपान व गांजा सेवन केलेली जागा, टेबल पॉइंटपासून पायवाटेने दरीत उतरून कथित अत्याचार केलेले ठिकाण आणि त्यानंतर पसार होण्यासाठी वापरलेला मार्ग आरोपींनी पंचनाम्यावेळी दाखविल्याचे पंचाने न्यायालयात सांगितले होते. या पंचनाम्याचे चित्रीकरणही न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी २५ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे. बचाव पक्षातर्फे मुख्य लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख ॲड. करीम जीवनी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT