प्रभाग क्रमांक : 35 सनसिटी-माणिकबाग
सनसिटी-माणिकबाग प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी या पक्षाकडे इच्छुकांची यादी मोठी आहे. यामुळे भाजपला तिकीट वाटप करताना कसरत करावी लागणार आहे. त्या तुलनेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी भाजपचे इच्छुक अन्य पक्षांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
या प्रभागाची लोकसंख्या 78 हजार 493 इतकी आहे. महापलिकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी आणि मंजूषा नागपुरे यांनी विजय मिळवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या भागात गत निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माजी नगरसेवकांसह डझनभर इच्छुकांची यादी आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांना संधी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.
गेल्या निवडणुकीतील आरक्षणात बदल झाल्याने प्रभागाच्या निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे. मागील निवडणुकीतील नागरिकांचा मागास प्रवर्गाऐवजी आता नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाऐवजी सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी एकच
जागा शिल्लक राहिल्याने भाजपमध्ये माजी नगरसेविका ज्योती गोसावी आणि मंजूषा नागपुरे यांच्यात तिकिटासाठी स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही माजी नगरसेविकांपैकी एकीला सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवावी लागेल. त्यात आता भाजपकडून गेल्या निवडणुकीतील माजी नगरसेवकांना संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रभागाचा भाग पर्वती व खडकवासला या दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे आमदारही आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करतील. सर्वसाधारण जागांसाठी माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप हे प्रमुख दावेदार आहेत. तसेच, पक्षाकडून सचिन मोरे, पल्लवी चाकणकर, अविनाश चरवड आदींसह डझनभर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) माजी नगरसेवक शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, जयश्री जगताप, संदीप कडू हे इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून बाळासाहेब प्रताप, सुयोग गायकवाड, अजय खुडे, महेश शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेनेकडून (ठाकरे गट) वैभव हनमघर, संतोष गोपाळ, राजू चव्हाण आदी इच्छुक आहेत. तसेच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेसह (शिंदे गट) इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
जुन्या सनसिटी-हिंगणे खुर्द प्रभागातील विश्रांतीनगरचा भाग वगळून आणि वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर, सिंहगड कॉलेजचा भाग नव्याने समाविष्ट करून सनसिटी-माणिकबाग या प्रभागाची रचना करण्यात आली आहे. विधानसभेच्या पर्वती आणि खडकवासला मतदारसंघातील भाग या प्रभागांमध्ये येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल या हिंदुत्वादी संघटना या भागात मजबूत आहे. यामुळे भाजपचा सामना करण्यासाठी विरोधकांची या प्रभागात कसोटी लागणार आहे.
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब सर्वसाधारण (महिला)
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण