पुणे : पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात झालेल्या प्राथमिक चर्चेत 11 प्रभागांत 40 जागा अजित पवार गटाने मागितल्याची माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली असून, ही मागणी भाजपने फेटाळल्याने राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात फूट पडली. यातील अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा गट महायुतीत सहभागी होऊन राज्याच्या विकासाचा दाखला देत सत्तेत सहभागी झाला, तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा गट हा विरोधी गटात गेला आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे सुरू आहे. नगरपरिषदा, नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. थोड्याच दिवसांत जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकादेखील होण्याची शक्यता आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेली आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. यामुळे इच्छुकांनी आता तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी असलेली महायुती कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांची खलबते सुरू झाली आहेत.
भाजपसोबत जाण्यासाठी ’विकासाचे राजकारण’ हे कारण पुढे केले असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा दोन्ही फुटीर गटांतील कार्यकर्त्यांनी मनात बाळगली. मात्र, स्थानिक निवडणुकांना विलंब होत असल्याने आणि आता जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पंचाईत झाली आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद एकेकाळी होती. मात्र, 2017 मध्ये भाजपने 100 जागा मिळवत एकहाती सत्ता महापालिकेवर मिळवली होती.
येऊ घातलेल्या 2025-26 च्या महापालिका निवडणुकीसाठी देखील भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. 120 पेक्षा अधिक जागा मिळविण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. भाजपच्या बाजूने असलेल्या वातावरणामुळे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची महायुती व्हावी, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने (अजित गट) महायुतीसाठी भाजपसोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. 11 प्रभागांमधील 40 जागांची मागणी करण्यात आली. मात्र, भाजपने या मागणीला थेट नकार दिल्याचे या पदाधिकाऱ्यानेच स्पष्ट केले. जर महायुती झाली नाही तर महाविकास आघाडीतील पक्षातील जुळवून घेत ’मैत्रीपूर्ण लढत’ हा एकमेव पर्याय राहील, अशी कबुली देखील या पदाधिकाऱ्याने दिली.
भाजपने नकार दिल्याने राष्ट्रवादीतील अनेक इच्छुकांचेच मनोधैर्य ढासळल्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत हातमिळवणी करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले आहे. जर महायुती झाली नाही तर महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचीही शक्यता असल्याचे संकेत नेत्यांच्या व्यक्तव्यातून मिळू लागले आहेत.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची आम्ही तयारी सुरू केली आहे. महायुतीसंदर्भात अद्याप आमची कोणतीही बैठक झालेली नाही. ज्या चर्चा आहेत त्या निराधार आहेत. आम्ही सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. -सुनील टिंगरे, शहराध्यक्ष (पूर्व), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार)