Pune Municipal Corporation Election 2025 Bjp Strategy
पुणे : महापालिकेत पुन्हा निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांना गळाला लावण्यात भाजपने यश मिळविले असून, येत्या काही दिवसांतच या सर्वांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Latest Pune News)
महापालिकांच्या गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार आता सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरवात केली आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार की निवडणुकांना स्वतंत्र सामोरे जाणार यासंबधीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे.
मात्र, 2017 ला महापालिकेत तब्बल 97 जागा जिंकून एकहाती सत्तेत आलेल्या भाजपने आता पुन्हा स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी 2017 चा फॉर्म्युला पुन्हा वापराला जाणार असून, पुन्हा एकदा विरोधी पक्षातील मातब्बरांना पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता असून, अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे काही दिग्गज इच्छुक गळाला लावण्यात भाजपने यश मिळविले असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच या सर्व इच्छुकांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने एकूण 41 प्रभाग तयार झाले आहेत. त्यानुसार 165 जागांसाठी ही निवडणूक होणार आहेत. गत निवडणुकीत भाजपचे 97 नगरसेवक निवडून आले होते. 11 समाविष्ट गावांच्या समावेशानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दोनपैकी भाजपचा एक नगरसेवक निवडून आला होता. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या 98 झाली होती. त्यातच कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेच्या 5 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे थेट 104 जागांवर भाजपचा आता दावा असणार आहे. मात्र, या वेळेस भाजपने थेट 125 जागांचे टार्गेट ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ज्या प्रभागांमध्ये 2017 च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते, अशा प्रभागांवर आता भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. यामधील बहुतांश प्रभागात मित्रपक्ष राष्ट्रवादीचेच नगरसेवक होते. त्यामुळे आता भाजपने याच नगरसेवकांवर आणि त्याठिकाणच्या मातब्बर इच्छुकांना पक्षात घेण्याचे नियोजन केले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने अशाच पद्धतीने मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नगरसेवकांना पक्षात घेऊन मोठे यश मिळविले होते. आता तोच फॉर्म्युला पुन्हा वापरला जाणार आहे.
काँग्रेसचा माजी नगरसेवकही भाजपच्या वाटेवर आहे, तर शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांपैकी नक्की कोणाला पक्षात घ्यायचे, हे अद्याप निश्चित होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी पदाधिकाऱ्याचाही प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा या पक्ष प्रवेशाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नसला, तरी निवडून येण्याची क्षमता या निकषात संबधित पदाधिकाऱ्यांना भाजपचे दरवाजे उघडले जातील अशीच चर्चा आहे.
सर्वाधिक मोठा धक्का वडगाव शेरी मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या चिरंजिवांच्या पक्षप्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: आमदार आणि त्यांच्या चिरंजीव ह्या केवळ अफवा असल्याचे सांगत आहेत. मात्र, ही चर्चा प्रत्यक्षात खरी ठरल्यास पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसून भाजपसाठी मोठी जमेची बाजू ठरू शकणार आहे. या शिवाय तुतारीकडे असलेली एक माजी नगरसेविका भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
संबंधित प्रभागातील राजकीय गणिते आणि निवडणुकीचा सर्व्हे लक्षात घेऊनच आगामी काळात यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक माजी नगरसेवक आणि ज्या प्रभागात भाजपचे मजबूत उमेदवार नाहीत, अशा प्रभागांमधील इच्छुकांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी संबंधितांबरोबर चर्चाही झाल्या असून, निवडणुकीतील युतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपने अशाच पद्धतीने टार्गेट केले असल्याचे भाजपमधील सूत्रांकडूनच सांगण्यात आले.
कोथरूड, वडगाव शेरी अन् पर्वती टार्गेटवर
कोथरूड हा भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत महापालिका निवडणुकीतही विरोधी पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आता सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन पक्षांना खिंडार लावण्यात यश मिळविले असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या पदाधिकाऱ्यांच्या चिरंजीवांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.