

शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात 15 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती संचालक योगेश जगताप यांनी दिली.(Latest Pune News)
कारखान्याचा गाळप हंगाम 2025-26 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उपाध्यक्षा संगीताताई कोकरे व बाळासाहेब कोकरे या उभयतांचे हस्ते पार पाडला. या वेळी योगेश जगताप बोलत होते. ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजीकाका कोकरे, स्वप्निल जगताप, नितीन सातव, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, राजेंद्र बुरुंगले, विजय तावरे, अविनाश देवकाते, गणपत खलाटे, सतीश फाळके, नितीन शेंडे, जयपाल देवकाते, देविदास गावडे, रतनकुमार भोसले, विलास देवकाते, दत्तात्रय येळे, ज्योतीताई मुलमुले, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी व सभासद या वेळी उपस्थित होते.
योगेश जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. यंदाचा हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पाऊस चांगला झाल्याने उसाचे उत्पन्न वाढणार आहे. त्याअनुषंगाने गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामधून अधिकचे उत्पन्न घेण्याचा मानस आहे. डिस्टिलरीच्या माध्यमातून 2 कोटी लिटर स्पिरिटचे उत्पादन तसेच सहवीज निर्मितीतून 6 ते 7 कोटी वीज युनिट निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील गाळप हंगामात उसाला कारखाना सभासदांना आज अखेर 3332 रुपये प्रतिटन दर दिला आहे.
कर्मचाऱ्यांनादेखील चांगला बोनस देण्याचा मानस आहे. सहकारातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याच्या उपाध्यक्षा, सर्व संचालक मंडळ, सभासद यांच्या सहकार्याने तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या परिश्रमाने कारखान्याची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू असल्याचे योगेश जगताप यांनी नमूद केले. ऊस तोडणी, वाहतूकदार यांच्याशी करार झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र तावरे, ज्ञानदेव बुरुंगले, शेखर जगताप, प्रकाश देवकाते आदींनी मनोगत व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी महिलेला कारखान्याचे उपाध्यक्ष करून जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून कारखान्याच्या तसेच सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करणार आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास उपस्थित मान्यवर (छाया : प्रा. अनिल तावरे)
संगीताताई कोकरे, उपाध्यक्षा, माळेगाव साखर कारखाना