पुणे: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून, भारतीय जनता पक्षाची (भाजप) पहिली उमेदवार यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 125 जागा जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असली तरी मंगळवारी कोणत्याही प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर होणार शक्यता नाही. येत्या काही दिवसांत राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करून आपले पत्ते उघडणार आहेत.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत सध्या चर्चा अंतिम टप्प्यात असून, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिली बैठक पार पडली आहे. जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी शिवसेनेकडून काही जागांची प्राथमिक यादी भाजपकडे सादर करण्यात आली असून, त्या जागांवर विचारमंथन सुरू असल्याचे समजते. युतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळणार, याकडे भाजपमधील इच्छुकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या जागांवरील उमेदवारांची पहिली यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडे सध्या 105 माजी नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने या जागांवर मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यमानांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन दिवसांत कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यानंतर यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या कोणतीही ठराविक तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, तारीख लवकरच जाहीर केली जाईल.धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप