पुणे : पुण्यात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम झालेल्या उमेदवारांच्या नावावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिकामोर्तब करणार आहेत. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ही यादी घेऊन गुरुवारी मुंबईला रवाना झाले. महापालिकेसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मुंबईत वर्षा बंगल्यावर त्यांची रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यादीवर अतिम निर्णय घेणार असल्याने ही यादी शुक्रवारी (दि. २६) जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप पक्ष कोअर कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत आठही विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी चर्चा करून ४१ प्रभागातील काही उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती.
ही यादी घेऊन केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूकप्रमुख गणेश बिडकर, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर आदी प्रमुख नेते गुरुवारी मुंबईला गेले. ही यादी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुंबईत प्रदेश कमिटी समोर ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक उमेदवारांची नावे व त्यांची निवडून येण्याची पात्रता तपासली आहे. रात्री या संदर्भात उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर या बैठकीत चर्चा सुरू होती.
भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने 'सर्वसाधारण' आरक्षण असलेल्या बहुतांश प्रभागात लढण्याची दावेदारी अनेकांनी केली आहे. त्यासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांकडून मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यात भाजपच्या आमदारांनी स्वत:च्या जवळच्या व कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही या बाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याने अंतिम यादीत नेमकी कोणाची वर्णी लागणार आहे, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.