या प्रभागाची (क्र. 20) रचना भाजपला अनुकूल असल्याचे चित्र असले, तरी आगामी महापालिका निवडणुकीत शंभर टक्के कमळ फुलण्यासाठी पक्षाला सावधगिरीने पावले टाकावी लागणार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासपुढे (शरद पवार गट) बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. बिबवेवाडी गावठाणातील मते आणि इच्छुकांचे मनसुबे हे निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.
प्रभागाची लोकसंख्या 78 हजार 980 इतकी आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या 8 हजार 214 इतकी आहे. या प्रभागात ‘अ’ गटसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘ब’ आणि ‘क’ गट सर्वसाधारण प्रवर्ग (महिला), तसेच ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. बिबवेवाडी गावठाणातील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. तसेच गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर माजी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचा मुद्दाही महत्त्वाचा असणार आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, सुनील कांबळे, अनुसया चव्हाण यांनी विजय मिळवला होता. यामुळे या प्रभागात भाजपचे प्राबल्य असल्याचे दिसत आहे. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे उमेदवार देताना पक्षाला कसरत करावी लागणार आहे. तसेच बंडखोरी रोखण्याचे आव्हानही पक्षापुढे असणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग््रेासकडे (शरद पवार गट) देखील इच्छुकांची यादी मोठी असल्याने तिकीट वाटपानंतर नाराजी नाट्य उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे तिकीट वाटपानंतर बंडखोरी रोखण्याचे या दोन्ही पक्षांपुढे आव्हान असणार आहे.
आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण मिसाळ हे इच्छुक आहेत. तसेच आमदार सुनील कांबळे यांची मुलगी सुप्रिया कांबळे या देखील भाजपकडून इच्छुक आहेत. मात्र, या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण नसल्याने त्यांना सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच मानसी देशपांडे, प्रशांत दिवेकर, राजेंद्र शिळीमकर हे पक्षाकडून प्रमुख दावेदार आहेत. या निवडणुकीत या प्रभागात भाजप घराणेशाहीला प्राधान्य देणार की, कार्यकर्त्यांना संधी देणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान या प्रभागात निवडणुकीचा मुख्य सामना हा भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यातच होणार आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग््रेास आणि शिवसेना (शिंदे गट) हे पक्षही ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांचे मत परिवर्तन करण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) कितपत यशस्वी होणार? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील माजी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचा हिशेबही या निवडणुकीत होणार आहे. या प्रभातील मतदार नेमका कुणाला कौल देणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार
भाजप : माजी नगरसेविका मानसी देशपांडे, करण मिसाळ, प्रशांत दिवेकर, राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, सुप्रिया कांबळे, प्रीतम नागापुरे, आदित्य जागडे, महेंद्र व्यास, महेंद्र सुंदेचा मुथा, अमोल रासकर, पुजा रासकर.
राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) : सचिन पासलकर, श्रीधर कामठे, विनय पाटील, मदन वाणी, दादा सांगळे, संतोष बिबवे, रूपाली बिबवे, मृणालिनी वाणी, संजय ववले, नीलेश शाह.
राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : माजी नगरसेवक सुनील बिबवे, गौरव घुले.
काँग््रेास : माजी नगरसेवक बंडू नलावडे, रामविलास माहेश्वरी, विजय उतुरे, रवी ननावरे, राधिका मखमाले.
शिवसेना (ठाकरे गट) : अरुण पापळ, शशी पापळ, सुधीर शेळके, सचिन जोगदंड, सुरेंद्र चिकने.
मनसे : विक्रांत अमराळे, राहुल गवळी, अभिजित टेंभेकर, अनिता चव्हाण.
रिपाइं : बाबूराव घाडगे.
भाजपच्या हक्काच्या मतांचे होणार विभाजन
प्रभाग वीस हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपने चारही जागांवर विजय मिळवला होता. मात्र, नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 39 मधून 17 हजार मतदारांचा या प्रभागात समावेश करण्यात आला आहे. तर या प्रभागातून हमालनगर, न्यूस्नेहनगर सोसायटी, आंबेडकरनगर झोपडपट्टी, प्रेमनगर आदी भाग वगळण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या हक्काच्या मतांचे विभाजन होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.